Mumbai Drinking Water | समुद्र भागवणार मुंबईकरांची तहान! 
मुंबई

Mumbai Drinking Water | समुद्र भागवणार मुंबईकरांची तहान!

२०३१ पर्यंत ६०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दीड कोटी मुंबईकरांची तहान भागवणे आता तलावांना शक्य नसल्यामुळे येणाऱ्या चार ते पाच वर्षांत अरबी समुद्र मुंबईकरांची तहान भागवणार आहे. २०३१ पर्यंत समुद्रातून सहाशे दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याचा फारसा तुटवडा भासणार नसल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.

मुंबई शहराची सध्याची लोकसंख्या दीड कोटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे दररोज ४,६६५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेकडून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत होता. परंतु हा पाणीपुरवठा मुंबईतील दीड कोटी लोकसंख्या व कामानिमित्त अन्य शहरातून मुंबईत येणारे सुमारे ५० ते ६० लाख नागरिकांना कमी आहे. त्यामुळे मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. आता तर दहा टक्के पाणी कपात व गळती व चोरीच्या माध्यमातून वाया जाणाऱ्या पाण्यामुळे शहराच्या विविध भागात पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. १० टक्के पाणी कपात लागू असल्यामुळे जवळपास ४०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा कमी झाला आहे.

पाण्याची गळती व चोरी या माध्यमातून दररोज ६०० दशलक्ष लिटर पेक्षा जास्त पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहरातील करदात्या नागरिकांना सध्या जेमतेम ३,१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. म्हणजेच जवळपास १,६६५ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. मात्र येणाऱ्या चार ते पाच वर्षांमध्ये मुंबईकरांची तहान अरबी समुद्र भागवणार आहे. गोराई येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प सुरू असून या प्रकल्पातून दररोज ४०० दशलक्ष लिटर पाणी २०२९-३० या आर्थिक वर्षापर्यंत मुंबईकरांना मिळणार असून वर्सोवा येथे उभारण्यात येणाऱ्या खार पाणी गोड करण्याच्या प्रकल्पातून २०३१ पर्यंत दररोज २०० दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT