मुंबई : पुढारी वृत्तसेवा
तेरा वर्ष मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा भव्य दिव्य गणपती साकारणारे गणेश मूर्तिकार गजानन देऊ तोंडवळकर (अण्णा) यांचे मालवण तालुक्यातील त्यांच्या पेंडूर या गावी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मधल्या काळात मुंबईच्या गणेशोत्सवाची शान समजल्या जाणाऱ्या गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची महाकाय मूर्ती सलग १३ वर्षे घडवणारा अवलिया मूर्तीकार हरपल्याने मूर्तिकार आणि सार्वजनिक मंडळांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Mumbaicha Raja)
तोंडवळकर यांचे पार्थिव मुंबईला त्यांच्या दादर नायगाव येथील राहत्या घरी आणण्यात आले होते. बुधवारी दि. ०३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या घराजवळून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. ईवाडा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील मूर्तीकार बंधू भगिनींचा आधारस्तंभ हरपल्याने सर्व स्तरातून त्यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मूर्तिकारांचे विषय ते सरकार दरबारी पोट तिडकीने मांडत असल्याचे गणेश उत्सव समन्वय समितीचे गणेश वालावलकर यांनी सांगितले.
तरुण मूर्तिकारांसाठी तोंडवळकर प्रेरणास्थान होते. एखादा होतकरू मूर्तिकार मोठी मूर्ती घडवत असताना त्याचे काम अडले तर तोंडवळकर स्वतः जाऊन त्या मूर्तिकारास मार्गदर्शन करत असत. मूर्तिकारांचे ज्वलंत प्रश्न त्यांनी महानगरपालिकेपासून ते मुख्यमंत्र्यांचा दरबारी योग्य रीतीने मांडले होते. मूर्तिकारांचे कारखाने, त्यांच्या अडीअडचणी संदर्भात ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यामुळे तोंडवळकर ह्यांच्या मागे मूर्तीकरांचा मोठा समूह उभा होता. त्यांच्या जाण्याने मूर्तिकार क्षेत्रात खळबळ मजली आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार वेलिंग यांच्यानंतर ढाचा बनवून मुर्त्या घडवणाऱ्या काही मोजक्या मूर्तिकारांपैकी ते एक असल्याची माहिती मुंबईचा राजा मंडळाचे पदाधिकारी आनंद मोरे म्हणाले.