मुंबई : राज्यामध्ये सर्व विभागांच्या शाळांध्ये असलेल्या पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह जिओे टॅगिंग करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीची पडताळणी करावी, जिल्हा नियोजनमधून निधी घेणार्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांनी 22 विभागांच्या 100 दिवस आराखड्याचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री, राज्यमंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जीकरण करताना त्याचे पुढील पाच वर्षांचे व्यवस्थापन संबंधित पुरवठादार कंपनीला देण्यात यावे. इमारतीवरील सौर पॅनलची स्वच्छता राखावी, अशा सूचनाही फडणवीस यांनी केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळास स्वतःचे जाहिरात धोरण तयार करावे त्यासाठी चांगल्या सल्लागाराची नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या. यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढेल. शंभर दिवसांच्या आराखड्यामुळे नागरिकांना गतिमान सेवा मिळत आहेत. अशाच पद्धतीने भविष्यातही विभागांनी विहित कालमर्यादा आखून कामे पूर्ण करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. या बैठकीत एकूण 22 विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांच्या एकूण मुद्द्यांपैकी 44 टक्के मुद्द्यांवर पूर्णतः काम झाले आहे. तसेच 37 टक्के मुद्दे अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील. मात्र 19 अद्याप पूर्ण झाले नाहीत. या कामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागांनी दिली.
जिओ टॅगिंग म्हणजे फोटो, व्हिडीओ, वेबसाईट किंवा इतर माहितीला भौगोलिक स्थान जोडणे. यात अक्षांश आणि रेखांश वापरून माहितीच्या ठिकाणाची अचूक नोंद केली जाते. यामुळे स्थाननिश्चिती सोपी होते. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येते तसेचे सुरक्षिततेच्या द़ृष्टीनेही अचूक आणि वेळेत उपाययोजना करणे शक्य होते.