मुंबई ः राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आजपासून सुरू होत असून, दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांसाठी ही नवी सुरुवात असेल. विदर्भ वगळता बहुतांश भागात शाळांना आजपासून सुरुवात होत आहे. पालक आणि लोकप्रतिनिधींच्या भेटी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा प्रारंभ यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष विशेष ठरणार आहे.
एप्रिल महिन्यात उन्हाच्या कडाक्यात वाषिक परीक्षा संपल्यानंतर यंदा राज्यभरातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. राज्यभरातील शाळांमध्ये ‘100 शाळांना भेटी’ उपक्रमांतर्गत शिक्षणमंत्री, स्थानिक आमदार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आज शाळांना भेटी देणार असून, मूलभूत सुविधा, शौचालय, पाणीपुरवठा, क्रीडा साधने, स्वच्छता आणि व्यवस्थापन समित्यांच्या कार्याचा आढावा घेतला जाणार आहे.
शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत फुगे, रांगोळी, सजावट, स्वागतगीतांद्वारे करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदाच्या वर्षापासून इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन अभ्यासक्रम आणि पद्धतींना सुरुवात झाली आहे. ‘पाच+तीन+तीन+चार’ या रचनेनुसार नव्या अभ्यासक्रमाचा प्रारंभ यंदा पहिलीपासून होतो आहे. भाषिक विकासावर अधिक भर, अनुभवाधारित शिक्षण, सर्जनशीलतेला वाव, खेळ व कृतींवर आधारित पद्धत, हे याचे मुख्य वैशिष्ट्य. ‘घोकंपट्टी’ला बाजूला ठेवून ‘क्षमता’ हे मूल्यांकनाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
पहिलीची नवीन पाठ्यपुस्तकं ही एनसीईआरटीच्या धर्तीवर तयार करण्यात आली असून त्यात मजकुराऐवजी कृती, चित्रे, संवाद यावर भर देण्यात आला आहे. सीबीएसई पॅटर्नप्रमाणे राज्यातील शाळांमध्ये या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाईल.
शालेय शिक्षण विभागाने यंदा प्रथमच पूर्व प्राथमिक शाळांना अधिकृत मान्यता घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे अशा शाळादेखील यंदा नव्याने कार्यरत होतील. किती शाळांना मान्यता मिळाली आणि किती शाळा विनामान्यता सुरू राहणार याची माहिती लवकरच स्पष्ट होईल.
मागील सरकारच्या कार्यकाळातील अडचणी लक्षात घेता यंदा राज्य शासनाने वेळेत सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तके वितरित करण्याची तयारी केली आहे. बहुतांश शाळांमध्ये याबाबत आवश्यक वितरण पूर्ण करण्यात आले आहे. यंदा गणवेश मात्र समान असेल ही सक्ती नाही, सर्वाधिकार शाळा समितींना दिले आहेत.
राज्यपालांच्या निर्देशानुसार शाळांची वेळ सकाळी 9 नंतर असावी असा निर्णय घेतला गेला होता. मात्र, याच्या अंमलबजावणीबाबत गेल्या वर्षी स्पष्टता नव्हती आणि अनेक शाळांनी तो निर्णय पाळलाच नव्हता. यंदा त्यावर काय अंमलबजावणी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पानं जोडण्याची योजना यंदा रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, या उपक्रमातून अपेक्षित परिणाम न मिळाल्याचे कारण देण्यात आले आहे.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आता ‘360 अंशात्मक मूल्यांकन’ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ‘समग्र प्रगती पुस्तिका’ तयार करण्यात आली असून, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यात असणार आहे. यामुळे मुलाच्या सर्वांगीण प्रगतीचा मागोवा घेणे शक्य होईल.
पहिली ते दहावी विद्यार्थी
सरकारी शाळा - 53,54,721
खासगी अनुदानित
शाळा- 76,63,361
खासगी विनाअनुदान
शाळा- 50,66,356
नवीन वर्ग, नवीन वह्या, दप्तर, युनिफॉर्म, फी यामुळे पालकांवर आर्थिक ओझं येते. काही पालकांनी खासगी शाळांच्या फीवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी सरकारने ‘फी नियंत्रण समित्या’ नेमून शुल्काचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र प्रत्यक्षात अद्याप पालकांना दिलासा मिळालेला नाही.
राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी मागील काही काळात वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, शालेय पोषण आहार योजना समिती, पालक शिक्षक संघ, सखी सल्लागार समिती, तंबाखू नियंत्रण समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती अशा एकूण 15 प्रकारच्या समित्यांचा समावेश होता.