मुंबई : गणित म्हटले की भीती, कंटाळा आणि अवघड सूत्रांची आठवण, ही पारंपरिक प्रतिमा मोडून काढण्याचा प्रभावी प्रयत्न डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ (एचबीएसयू) येथील गणित विभागाने केला आहे. ‘सिग्मॅटिक्स’ या विशेष महोत्सवाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गणित हसतखेळत, प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण्यावर भर देण्यात आला आहे.
डिसेंबरमध्ये झालेल्या या वर्षीच्या सिग्मॅटिक्समध्ये राज्यातील 20 शाळांमधील प्रत्येकी पाच अशा एकूण शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. एमएससी (गणित)च्या विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आठ वेगवेगळ्या टेबलांवर गणिती संकल्पनांची मांडणी करण्यात आली. त्रिकोणमिती, तर्कशास्त्र, अनंताची कल्पना, बायनरी संख्या अशा विषयांची ओळख पत्त्यांचे खेळ, म्युझिकल चेअर्स, कोडी आणि रिलेमध्ये हिशेब सोडवून ‘बॅटन’ देण्यासारख्या कल्पक पद्धतींनी करून देण्यात आली.
वयातील जवळीक असल्याने शालेय विद्यार्थ्यांना हे सादरकर्ते अधिक आपलेसे वाटतात आणि प्रश्न विचारण्याचा संकोच राहत नाही, असे गणित विभागाचे प्रमुख प्रा. सेल्बी जोस यांनी स्पष्ट केले. महोत्सवात गणतीय घरफोडीची काल्पनिक कथा रंगमंचावर साकारत संशयित पात्रे उभी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा गणिताशी असलेला भावनिक आणि बौद्धिक संबंध जाणून घेण्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. ‘गणिताची भीती’ आणि ‘गणितातील आनंद’ अशा विषयांवरील विद्यार्थ्यांचे अनुभव पुढील वर्षीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यास मदत करतात. कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या आधुनिक क्षेत्रांचा पाया गणितातच असल्याचे प्रा. जोस यांनी अधोरेखित केले.