मुंबई : विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या वाढत्या घटनांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर आयोजित होणाऱ्या शिक्षण परिषदांमध्ये 'सकारात्मक शिस्त' या विषयावर किमान ४५ मिनिटांचे विशेष मार्गदर्शन सत्र घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरीय परिषदांमध्ये हे सत्र अनिवार्यपणे घेण्यात येणार असून, शिक्षकविद्यार्थी नातेसंबंध अधिक संवेदनशील आणि सकारात्मक करण्याच्या दिशेने हा उपक्रम घेतला जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची 'मुख्याध्यापक मार्गदर्शिका भाग २' मधील 'सकारात्मक शिस्त एक आव्हान' हा लेख मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विविध परिषदेच्या सत्रात शारीरिक शिक्षकांना शिक्षेबाबत शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदी, शिक्षकांची जबाबदारी, शिक्षेचे प्रकार व त्यांचे मानसिक-शारीरिक परिणाम, मेंदूवर होणारे दुष्परिणाम, तसेच विविध शैक्षणिक विचारवंतांचे सकारात्मक शिस्तीवरील विचार यांचा परिचय करून दिला जाणार आहे. वर्गातील संवाद, सहकार्य, समुपदेशन, योग्य शिस्तीचे मार्ग, सकारात्मक तंत्रे आणि प्रत्यक्ष उपक्रम यांसारखे मुद्देही सत्राचा भागाचा समावेश करावा, असेही म्हटले आहे.
विश्वासातून शिस्त पाहिजे
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या उपक्रमाला प्रेरणा दिली आहे. "शिस्त ही भीतीतून नव्हे, तर विश्वासातून निर्माण झाली पाहिजे. सकारात्मक शिस्त हीच मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.