मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी नाहीच! pudhari photo
मुंबई

School bag weight issue : मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी नाहीच!

विद्यार्थ्यांना पाठदुखी, तर पालकांना आर्थिक भुर्दंड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विवेक कांबळे

चिमुकल्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात ते ओझे काही कमी होताना दिसत नाही. एकाच विषयाची दोन-तीन पुस्तके दररोज शाळेत न्यावी लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर, दरवर्षी एवढी पुस्तके खरेदी करणे शाळांकडून बंधनकारक करण्यात आल्याने पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबत काही उपाययोजनाही राबविण्यात आल्या होत्या. मात्र, असे असले तरी आजही अगदी पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना भले मोठे दप्तर पाठीवर वागवावे लागत आहे.

सध्या इंग्रजी माध्यमांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच गणित, इंग्रजी, एन्व्हायर्नमेंटल स्टडीज या विषयांसाठी वर्कबूक, टेक्स्टबूक, इंटिग्रेटेड बूक अशी प्रत्येकी तीन पुस्तके विकत घ्यावी लागतात. त्यासोबत वह्या असतातच. म्हणजे एका दिवशी पाच विषयांचे तास असतील, तर विद्यार्थ्यांच्या दप्तरात किमान आठ ते दहा वह्या-पुस्तके असतात.

त्याशिवाय कंपास बॉक्स, ड्रॉईंग बॉक्स, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली या वस्तू असतातच. त्यामुळे दरदिवशी विद्यार्थ्यांना किमान सात ते आठ किलोचे ओझे घेऊन शाळेत जावे लागते. त्यामुळे शाळेत पोहोचण्याआधीच लहान मुले दमलेली असतात. पुन्हा हे ओझे घेऊन शाळेत आपापले वर्ग गाठण्यासाठी त्यांना दोन-चार मजलेही चढावे लागतात.

पालकांना आर्थिक भुर्दंड

यातील वर्कबुक्स हे पालकांना शाळांकडूनच विकत घेणे बंधनकारक आहे, तर टेक्स्टबूक आणि इंटिग्रेटेड बुक्स बाहेरून विकत घेण्यास सांगितले जाते. त्यामुळे एकाच विषयासाठी पालकांना तीन-तीन पुस्तकांचा खर्च करावा लागतो.

पुस्तकांची अनुपलब्धता

टेक्स्टबुक्स आणि इंटिग्रेटेड बुक्स हे दुकानांतून विकत घेण्यास शाळा सांगतात. आता शाळा सुरु होऊन दोन महिले उलटले, पहिली युनिट टेस्टही जाहीर झाली, तरी काही विषयांची पुस्तके दुकानांमध्ये अद्याप उपलब्धच झालेली नाहीत. शासनाकडूनच मुबलक प्रमाणात पुस्तके येत नसल्याचे दुकानदार सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT