मुंबई : भारताला समृद्ध आणि दीर्घ अशी ज्ञानपरंपरा असली तरी आपण मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीत शिकलो. आपली बुद्धी दुर्दैवाने त्या पद्धतीत घडली. म्हणूनच आपण शरीराने, वंशाने भारतीय असलो तरी मन-चित्ताने अजूनही विदेशी आहोत. आपल्या बुद्धीवर वसाहतवादाचा प्रभाव कायम आहे. त्या प्रभावातून मुक्त झालो तरच आपल्या पारंपरिक ज्ञानाचा अर्थ लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
घाटकोपर येथे आर्य युग विषय कोश भाग चारच्या प्रकाशन सोहळ्यात भागवत बोलत होते. मोहन भागवत म्हणाले की, मानवाच्या शाश्वत सुखासाठी भारतीय विचाराकडे जग पाहात आहे, त्यामुळे या ज्ञान परंपरेचा अभिमान आपण मानला पाहिजे. भारताच्या इतिहासात एक युग होऊन गेले, ज्यावेळी आर्यता म्हणजेच सुसंस्कृततेला घेऊन आपण जगभरात गेलो. आर्य नावाचा कुठला वंश नव्हता, श्रेष्ठ आचार-विचार असणाऱ्यांना त्यावेळी आर्य म्हटले जात असे. अशा या पूर्वजांचे मेक्सिकोपासून सैबेरियापर्यंत पूर्ण जगात संचार होता. ते जिथे कुठे गेले त्यांनी तेथील राज्ये ताब्यात घेतली नाही ना धर्मांतर केले. विश्व एक आहे हा ऋषीमुनींनी दिलेला विचार, सद्भावना घेऊन भारतीय संस्कृती, ज्ञान, गणित, आर्युवेद, विविध शास्त्र त्यांनी जगभरात नेले. जग हे जिंकण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी जायचे आहे हा विचार आपल्या पूर्वजांनी कटाक्षाने पाळला, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले.
आपण परमवैभव संपन्न होतो, परंतु, विलासता आली. आपण सर्व काही विसरलो, असे सांगतानाच आपण जगात सद्भावना घेऊन गेलो, पण जगातून जे भारतात आले त्यांनी आपल्याला नमवले आणि ते जेते झाले. त्यांनी विध्वंस केला. आधी जे आक्रमक आले, त्यांनी भारताला लुटले, पण त्यानंतर जे आले त्यांनी आपली बुद्धीच लुटून नेली. परंतु, आक्रमणे होऊनही आपली आध्यात्मिक परंपरा अखंड आहे, हे भागवत यांनी अधोरेखित केले. हल्ली विज्ञान म्हणते की, तुमचे ज्ञानेंद्रिय जे पाहतात ते योग्य असेलच असे नाही. मनुष्य सात रंग जाणतो, पण श्वानाला दोनच रंग समजतात. परंतु, दोघेही जे पाहतात ते सांगतात, दोघांचेही सत्यच असते. परंतु, सत्य जाणायचे असेल तर भौतिक बंधनांच्या पलीकडे जाणे आवश्यक ठरते. आधी विज्ञान याला मानत नव्हते, आता मानू लागले आहे. अनेक पाश्चिमात्य विचारवंत आता पूर्वेकडील परंपरा, त्यांचे साहित्य यांचे अध्ययन केले पाहिजे हे आवर्जून सांगत आहेत. परंतु, आपल्या समृद्ध परंपरेविषयी जोवर पाश्चिमात्यांच्या हवाल्याने सांगितले जात नाही, तोवर कुणालाही पटत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.