रणजीत चौधरी  Pudhari
मुंबई

Mumbai Crime | धक्कादायक! मुंबईत मित्राकडून मित्राचा खून: दुर्गंधीमुळे प्रकार उघड; 48 तासांत आरोपी गजाआड

सांताक्रूज परिसरातील कलिना भागातून संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Santacruz Murder Case

मुंबई : आर्थिक वादातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अवघ्या 48 तासांत आरोपीला अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय रणजीत चौधरी याची त्याचा मित्र विक्की चौधरी याने हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रणजीत हा गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईत राहत होता आणि पेंटर म्हणून काम करत होता. दोघेही सांताक्रूज परिसरातील कलिना भागात राहत होते.

पैशांच्या वादातून वाढला संघर्ष

5 फेब्रुवारी रोजी रणजीत आणि विक्की यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याच रात्री विक्कीने रणजीतवर केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर 6 फेब्रुवारीरोजी सकाळीच विक्की बॅग घेऊन घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रणजीतकडे मोबाईल फोन नसल्याने त्याचे वडील वारंवार विक्कीला फोन करून रणजीतबद्दल विचारणा करत होते. मात्र, विक्कीने रणजीतबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

दुर्गंधीमुळे उघड झाला प्रकार

7 फेब्रुवारी रोजी शेजाऱ्यांना घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दार उघडले असता रणजीतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहावर हत्याराने मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.

तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी संशयित विक्की चौधरीचा शोध सुरू केला आणि सांताक्रूज परिसरातील कलिना येथून त्याला अटक केली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून हत्येसाठी वापरलेल्या शस्त्राचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT