Sanjay Shirsat, Sanjay Raut File Photo
मुंबई

Sanjay Raut: शिंदेंच्या मंत्र्याने अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावासाठी ५ कोटींची लाच मागितली? राऊतांचा गंभीर आरोप

संजय शिरसाट यांनी अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावासाठी ५ कोटींच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

मोहन कारंडे

Sanjay Raut accuses Sanjay Shirsat Bribery Allegations

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय शिरसाट यांनी अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावासाठी ५ कोटींच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

मुंबईतील ७२ व्या मजल्यावर ५ कोटींची मागणी?

लातूर येथील नरसिंग उरगीर यांच्या आरती सेवाभावी संस्थेमार्फत उदगीर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरसाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव ६ ऑक्टोबर २०२५ रोजी समाजकल्याण मंत्रालयात सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी प्रस्तावाच्या २० टक्के म्हणजे सुमारे ५ कोटी रुपयांची लाच मुंबईतील ७२ व्या मजल्यावर खासगी घरी बोलवून स्वतः मागितली, ती रक्कम दिली नसल्यामुळे आपला प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाही, असा आरोप नरसिंग उरगीर यांनी केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

"सरकार भ्रष्ट्राचाराची खाण बनलय"

याच प्रकरणावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आपले सरकार हे भ्रष्ट्राचाराची खाण बनले आहे. राज्याची आणि जनतेची लूट खुलेआम सुरू आहे, आपण काय करताय? लहान कामांसाठी देखील मंत्री पैसे मागत आहेत, हे अराजक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

नरसिंग उरगीर आज माध्यमांसमोर येणार

राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, "लातूर येथील नरसिंग उरगीर मला भेटले, या आधी त्यांची व्यथा घेऊन ते सरकार दरबारी, लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटले पण निकाल शून्य. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने पाच कोटींची लाच मागितली जाते. देवेंद्रजी, हा असला दलितोद्धार काय कामाचा?” असा सवाल राऊत यांनी केला आहे. या प्रकरणात नरसिंग उरगीर आज माध्यमांसमोर येणार असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT