Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray alliance
मुंबई : हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नुकतेच एकत्र आले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील महानगरपालिकांमधील निवडणुका शिवसेना आणि मनसे खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्यात, असा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, असे संजय राऊत यांनी गुरुवारी (दि.१० जुलै) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
इंडिया आघाडीबाबत बोलताना राऊत म्हणाले, ''लोक असे विचारतात इंडिया आघाडीचे भविष्य काय? आम्ही जेव्हा राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रात एक प्रचंड जल्लोष झाला. त्याच्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की यापुढे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे भविष्य काय? त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली. आम्ही एकत्र निवडणुका लढल्या. आम्हाला चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीची एकही बैठक होऊ शकली नाही, अशी खंत स्वतः उद्धव ठाकरे यांनीसुद्धा व्यक्त केली होती. अनेक नेत्यांसमोर त्यांनी खंत व्यक्त केली,'' असे त्यांनी नमूद केले.
लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाराष्ट्र विधानसभेसाठी एकत्र लढले. आम्ही कोणीही आघाडीतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही त्याचे घटक आहोत. आजही महाविकास आघाडीसंदर्भात निर्णय एकत्र घेतले जातात, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
आता विषय राहतो, महानगरपालिकांचा. त्यासंदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत. महाविकास आघाडी अथवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील काय?. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी, खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणिते आणि समीकरणे असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावे लागते. कधी स्थानिक आघाडी करावी लागते. मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकेच सांगितले की, आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे. जो आपण ५ तारखेला पाहिला असेल. मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांमधील निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्यात, असा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्याबाबतही वक्तव्य केले. कोण दीपक केसरकर? हा माणूस दहा पक्ष फिरून आलेला आहे. त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केलं. हा बेईमान माणूस असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.