Pudhari
मुंबई

Sanjay Raut : "साप-विंचू पकडा अन् 'वर्षा'सह मंत्र्यांच्या घरात सोडा!" : संजय राऊतांचे आदिवासी बांधवांना खळबळजनक आवाहन

आश्रमशाळांना निधी दिला जातो तो कुठे जातो? ते कोणाचे लोक आहेत?

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Gadchiroli Ashram School Snakebite Death

"आदिवासी आश्रमशाळेच्या तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. नंदुरबार, गडचिरोली येथील आश्रमशाळेत सर्पदंश आणि विंचूदंशामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो. ज्यांचा मृत्यू होतो ते आदिवासींमधले 'जेन झी' आहेत. माझे आदिवासी बांधवांना आवाहन आहे की, त्यांनी साप, विंचू मुख्यमंत्री निवासस्थान असणाऱ्या 'वर्षा' बंगल्यावर व मंत्र्यांच्या घरात सोडावेत," अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

आश्रमशाळांमधील निधी कोठे जातो?

गडचिरोलीत आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला, तर आणखी तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्य सरकारने आदिवासींना विस्थापित केले आहे. भाजपचे देणगीदार लाच देतात, त्यांना डोंगर, नद्या उद्ध्वस्त करायला दिले आहे. आश्रमशाळांना निधी दिला जातो तो कुठे जातो? ते कोणाचे लोक आहेत? असा सवालही त्यांनी केला.

आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

दुर्गम भागात सर्पदंशाच्या अनेक घटना समोर आल्या. तिथे रुग्णवाहिका नसते. आई-वडिलांचे मृतदेह खांद्यांवर न्यावे लागत आहेत. आदिवासींमधून नक्षलवादी निर्माण होतात, त्यांना मग गोळ्या घातल्या जातात. मंत्री फक्त आदिवासींना नाचवत आहेत. गडचिरोली कलेक्टर, वनखाते, पालकमंत्र्यांना हप्ते जात आहेत. मुले मरत आहेत. आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

नक्षलवाद फक्त उद्योगपतींसाठी संपवला

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करत आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन हजार कंपन्या बंद झाल्या आहेत, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. नक्षलवाद फक्त उद्योगपतींसाठी संपवला, असा आरोप करत माझे आदिवासी बांधवांना आवाहन आहे की, त्यांनी साप, विंचू मंत्र्यांच्या घरात सोडावेत, असे राऊत म्हणाले. अमित शाह सभागृहात बोलायला तयार झाले; उपकार करत आहेत का, मेहरबानी करत आहेत का? असा बोचरा सवालही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT