Sanjay Raut Slams CM Devendra Fadnavis Davos Visit: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्याचे दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारावर टीका केली. त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगपतीच दावोसला जाऊन महाराष्ट्राशीच करार करत आहेत. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असा दावा देखील संजय राऊत यांनी केला.
त्यांनी फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण हिंदूस्तानातील मुख्यमंत्री दावोसच्या निसर्गरम्य वातावरणात पिकनिक करण्यासाठी गेले असल्याची टीका केली.
संजय राऊत म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांची पिकनिक दावोसला सुरू आहे. मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही तर संपूर्ण हिंदूस्तानच्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक दावोसला सुरू आहे. ती संपली की मुख्यमंत्री इलेक्शनमध्ये लक्ष घालतील. स्वित्झरलँडमधील दावोसमधील औद्योगिक कॉन्फरन्स अत्यंत हास्यास्पद आहे.'
'भारतातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिथं जातात अन् तिथं गेठीभेटी होतात. निसर्गरम्य वातावरणात मुख्यमंत्री भेटतात अन् तिथं चर्चा होतात. भारतातीलच उद्योगपती दावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात. हा सगळा पैसा जनतेच्या कराचा पैसा आहे.'
संजय राऊत यांनी अशा कॉन्फरन्सला जाण्यास हरकत नाही मात्र पंतप्रधानांनी यातून किती गुंतवणूक येते याच्यावर नजर ठेवायला हवी असे वक्तव्य केलं.
राऊत पुढे म्हणाले,' महाराष्ट्र सरकारने १४ लाख कोटीचे करार केले. १४ लाख रोजगार मिळणार. मुंबईत ९ लाख रोजगार मिळणार हे आकडे सुखावणारे आहेत. पण गेल्या पाच वर्षात कोणतेही मुख्यमंत्री दावोसला जातात तेव्हा हेच आकडे येतात.'
राऊत यांनी करारात महाराष्ट्रातीलच उद्योगपतींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचं सांगत पितळ उघडं पाडलं. ते म्हणाले, 'करार कोणाबरोबर झाले. jsw याचं मुख्यालय मुंबईच्या बीकेसीमध्ये आहे, लोढा यांचं हेडक्वार्टर मुंबईत आहे. सत्यजित तांबेच्या संगमनेरच्या कंपनीचा देखील दावोसमध्येच करार झाला आहे असं ऐकण्यात आलं आहे.'
'महाराष्ट्रात करार करा, यात देशातील कंपनींचे करार दावोसला जाऊन करणार असाल अन् त्याचे फोटो झळकावणार असाल तर भारताचं जगात हसं होणार. आकडे कशाला फुगवून सांगता.'
दावोस कराराचा फोलपणा दाखवून देताना राऊत म्हणाले, 'गेल्या पाच वर्षात दावोसला कितीवेळा गेला. प्रत्येक वर्षी जाता. पाच वर्षाचे आकडे काढले तर ७५ लाख कोटींच्या पुढे जातात. राज्यात एवढी गुंतवणूक कुठं झाली आहे दाखवा. ज्या गोष्टी मुंबईत बसून करू शकता त्यासाठी दावोसला का जाता.' असा सवाल देखील राऊत यांनी विचारला.
राऊतांनी जे आकडे खरे असतील तर स्वागत करतो. असं म्हणत गौतम अदानींचे उदाहरण देत टोमणा मारला. गौतम अदानी अख्खी धारावी घेत आहेत ते ५००० रोजगार देऊ शकत नाहीत. तर हे नऊ साडेनऊ लाख कोटींचा आकडा आला कुठून, जनतेला फसवू नका.
शिंदे सेनेवर टीका करताना राऊत म्हणाले, मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना आणि बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेणाऱ्यांना मुंबईतील महापौर बसवण्यासाठी दिल्लीतील गुजराती नेत्यांच्या पायात जाऊन बसावं लागत आहे.'