मुंबई : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. पण गौतम अदानी यांना मुंबई विकणे म्हणजे मराठी माणसांसाठी काम नाही. मोदींच्या मित्राच्या घशात फुकटात मुंबई घालणे, ही मुंबई आणि मराठी माणसांची सेवा नाही, अशी टीका करत भाजपने मराठी माणसांसाठी काय केले ते दाखवा, असे थेट आव्हान खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले.
उद्धव ठाकरेंमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, या भाजप नेत्यांच्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ठाकरे बंधू जर सत्तेसाठी एकत्र आले, तर मग तुम्ही एकमेकांची चम्पी मालिश करण्यासाठी एकत्र आलात का? भारतीय जनता पक्षाने आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसांसाठी काय केले? असा सवाल राऊत यांनी केला. तुम्ही मराठी माणसांची संघटना फोडली, असा आरोपही त्यांनी केला.
गोपीनाथ मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही. बेळगाव-कारवार सीमाप्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणत्याही भाजप नेत्यांनी आवाज उठवला नाही. अधिवेशनकाळात वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू, असे बोलले गेले, त्यावर मुख्यमंत्री म्हणून उभे राहून त्यांनी जाब विचारायला पाहिजे होता. ते त्यांचे कर्तव्य होते. पण ठाकरे उभे राहिले. महाराष्ट्र कसा तोडताय बघू, असे ते म्हणाले. पण मुख्यमंत्री उभे राहिले का आणि जाब विचारला का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला राज्याच्या तुकडा पाडून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावे लागले असते, असेही राऊत म्हणाले.