पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे यासाठी राज्यातील शिवसेनाप्रेमी मराठी नागरिकांनी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर या दिशेने पहिले सकारात्मक संकेत दोन्ही ठाकरे बंधूनी दिले आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपले मत व्यक्त केले आहे.
उद्धव आणि राज ठाकरे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणार का, या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव आणि राज हे दोघेही भाऊ आहेत. त्यांचे नाते अबाधित आहे. दोघांमध्ये राजकीय मतभेद असू शकतात. आजचा भाजप हा महाराष्ट्राचा नंबर एकचा शत्रू आहे. अमित शहा यांनी त्यांच्या स्वार्थासाठी शिवसेना फोडली, अशा लोकांना आम्ही घरात स्थान देणार नाही. आम्हाला सत्ता मिळणार नाही पण आमचा स्वाभिमान राखू."
संजय राऊत असेही म्हणाले की, "राज ठाकरे यांनी त्यांचा मुद्दा मांडला आहे. भावांमध्ये काही तक्रारी असतील तर महाराष्ट्राच्या हितासाठी मी सोडवीन, असे राज यांनी म्हटले आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, आम्ही भाऊ आहोत, आमचे कोणतेही तक्रारी नाहीत, जर काही असतील तर मी त्या सोडवीन; परंतु ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू, शिवसेनेचे शत्रू मानतो, त्यांना तुमच्या घरात जागा देऊ नका, त्यांच्यासोबत खाण्यापिण्यासाठी बसू नका. तुम्ही हे मान्य केले तर आम्ही नक्कीच बोलू.
अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहाणे फार कठीण गोष्ट आहे, मला असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. फक्त माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतच आहे. मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रातील पक्षातील मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा”, असे उत्तर त्यांनी मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिले.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी काही अटींसह मनसेसोबत जाण्याची तयारी दाखविली आहे. "मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी देखील किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे. मी देखील मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. पण माझी एक अट आहे," असे उध्दव ठाकरे म्हणाले.
"लोकसभेच्या वेळी आम्ही सांगत होतो, राज्यातून उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत. तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्रविरोधी हे सरकार तिथे बसले नसते. केंद्रात महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसवलं असतं. तसेच राज्यातही महाराष्ट्राचा विचार करणारे सरकार बसले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा आणि मग तडजोड करायची हे असे चालणार नाही", अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
"महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरवा. मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. माझ्याकडून कुणाशी भांडणे नव्हतीत, पण मिटवून टाकली चला. सर्व मराठी माणसांनी ठरवायचं भाजपसोबत जायचे की शिवसेनेसोबत म्हणजे एसंशिं, गद्दार नव्हे तर माझ्यासोबत जायचे", असेही उद्धव ठाकरे म्हणाले.