Sanjay Raut on Iran Israel conflict
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांपूर्वी इस्रायल दौऱ्यावरून परत आले आहेत. इराण हा भारताचा मित्र होता. काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने इराण उभा राहिला होता. हा देश आपल्याला अत्यंत स्वस्त दरात तेल देत होता. या युद्धात भारताने एक भूमिका घेणे आवश्यक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष नेतन्याहू यांना सांगून युद्ध थांबवायला हवे होते, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वेसर्वा खामेनी आणि त्यांचे कुटुंब ठार झाल्याचे वृत्त आहे. या युद्धात भारताने एक भूमिका घेणे आवश्यक होते. भारत आणि पाकिस्तान युद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थांबवू शकतात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायल, अमेरिका - इराण युद्ध का थांबवू शकत नाही याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही राऊत यांनी केले.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. आता ते इराण ताब्यात घेतील. अमेरिका, इस्रायल कोणत्याही देशाचा ताबा घेतील. यानंतर हळूहळू त्यांची पावले भारताकडे वळतील. केंद्र सरकार व्यापार करार करून गुलाम झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे पाकिस्तानला शस्त्र पुरविण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत भारताचे परराष्ट्र धोरण काय आहे? की फक्त परदेशात जाऊन मिठ्या मारायच्या आणि भारतात फोटो पाठवायचे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
आता सुरू असणाऱ्या युद्धाचा मोठा परिणाम होईल. हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आले आहे, भूगोल बदलण्याची शक्यता आहे, भारताला चटके बसतील, अशी भीती व्यक्त करत अनेक भारतीय पर्यटकांना युद्धाचा फटका बसला आहे. पुण्यातले एक कुटुंब तिकडे अडकले आहे, विमानतळावर हल्ला झाला आहे, भारतीय परराष्ट्र खातं आता काय करणार?, असा सवालही त्यांनी केला.