मुंबई : कल्याण-डोंबिवलीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांवर मनसेच्या पक्षनेतृत्वाने कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केली.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदे गटाला मनसेने पाठिंबा दिल्याबद्दल ठाकरे गटाने संताप व्यक्त केला. ज्याने महाराष्ट्राशी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी, मराठी माणसाशी गद्दारी आणि बेइमानी केली, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा अन्य संबंध ठेवायचे नाहीत, अशी आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.
मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढले असताना कल्याण-डोंबिवलीत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन शिंदे सेनेला पाठिंबा जाहीर केला.
कल्याण-डोंबिवलीचा विषय हा उद्धव ठाकरेंनी गांभीर्याने घेतला आहे, तर स्थानिक नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाने राज ठाकरे व्यथित आहेत, असा दावा करून राऊत म्हणाले, यासंदर्भात माझी राज ठाकरेंशी चर्चा झाली आहे. काही मिळाले नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोकं असतात. एकंदरीत राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न आहे. ही माझी आणि पक्षाची भूमिका नाही. तो स्थानिकांनी निर्णय घेतला आहे, असेही राज ठाकरे म्हणाल्याचे राऊत यांनी सांगितले.
फक्त स्थानिक पातळीवर विषय झाला, असे सांगून विषय संपत नाहीत. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपबरोबर असंग करताच त्यांच्या पक्षाने ताबडतोब पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रतारणा केल्याबद्दल पक्षातून काढून टाकले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीचा निर्णय हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असला तरी पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांशी प्रतारणा करून स्थानिक नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई करून पक्षातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.