Sanjay Raut on Gungi Gudiya remark : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेचे समर्थन करत, 'गुंगी गुडिया' हा काही असंसदीय शब्द नाही आणि राजकारणात आलेल्या सुनेत्रा पवारांनी टीका सहन करायलाच हवी, असे रोखठोक वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी बाळगलेल्या मौनामुळेच काँग्रेसने ते ट्वीट केले होते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "सुनेत्रा पवार राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे. त्या हळूहळू राजकारणात स्थिरावतील. बीडच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी भाषणाचा ताबा घेतला, त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडायला हवी होती. तिथे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे असते, तर त्यांना 'गुंगा-गुड्डा' म्हटले गेले असते. भूतकाळात इंदिरा गांधी यांच्यावरही अशी टीका झाली होती, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिले. सुनेत्रा पवार घटनात्मक पदावर असल्यानेच त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पुढे त्या नक्कीच बोलतील अशी अपेक्षा आहे."
काँग्रेस कार्यालयावर हल्ले करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी लोकांची कामे करावीत असा सल्ला देत राऊत म्हणाले, "सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध मुद्द्यांवर मौन बाळगून आहेत, म्हणजेच ते 'गुंगा-गुड्डा' आहेत."
शिवसेना-काँग्रेसच्या काळात नवी मुंबई विमानतळाला 'दि. बा. पाटील' नाव देण्याचा निर्णय झाला होता. याबाबत जोपर्यंत स्पष्ट आदेश येत नाहीत, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठवड्यातून १६ वेळा दिल्लीत येतात. त्यातील एखादा दौरा त्यांनी दि. बा. पाटील यांच्या या निर्णयासाठी काढावा," असा टोलाही त्यांनी लगावला.दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २:३० वाजता सुनावणी होणार असून, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला याप्रकरणी वेळ देण्याची विनंती केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.