Sanjay Raut on Sharad Pawar
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : "माननीय शरद पवार मोठे नेते आहेत. ते आदरणीय आहेत; पण ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठक घेणे म्हणजे तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देण्यासारखेच आहे. बैठक घेण्यासाठी विधान भवन ओस पडलं होतं का? एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, तिथेच बैठक घेण्याची गरज होती का?," अशा शब्दांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या विधान भवनात झालेल्या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. आमच्या दृष्टीने त्यांनी शरद पवार यांच्याशी बेईमानी केली होती, हे आम्ही लक्षात ठेवलं असतं. आम्ही पथ्य पाळलं असतं. आता महाविकास आघाडीतील अनेक घटकांनी पथ्य पाळले पाहिजे, असे आवाहनही राऊत यांनी आज (दि.९) माध्यमांशी बोलताना केले.
यावेळी राऊत म्हणाले की, बुधवारी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची विधानभवनात भेट झाली. या कृतीमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवता? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देत आहात; मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली, तिच्याविषयी तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, असेही राऊत यांनी सुनावले.
आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढत आहोत, तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देता? असा सवाल करत एकनाथ शिंदे काही यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, मनोहर जोशी आहेत का? असा सवाल करत, तुम्ही त्यांच्या दालनात जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेता, हे आमच्या मनाला लागलेली गोष्ट आहे. जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असले, तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे; गद्दारी ही गद्दारी आहे, असेही राऊत यांनी ठणकावले.
आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याएवढे सहिष्णू नाही. आमचं मन एवढं मोठं नाही. आम्ही असे करणार नाही. ज्यांना हे पटत असेल त्यांनी हे करावं; यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वसनीयता कमी झाली आहे, असेही राऊत म्हणाले.
शरद पवार यांनी काय करावे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण, तुम्ही (एकनाथ शिंदे) तुमच्या दालनात बैठक घेता आणि ती शिवसेनेला दुखावणारी ठरते, हे योग्य नाही. आम्ही अजित पवार यांच्या विधान भवनातील दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. कारण अजित पवारांनी शरद पवार यांच्याशी बेईमानी केली आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं असतं. आम्ही ते पथ्य पाळलं असतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक घटकांनी पथ्य पाळले पाहिजे, असे आवाहनही राऊत यांनी केले.
"शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे यात मला काहीच चुकीचे वाटत नाही. काल विधानभवनात झालेली बैठक ही सीमा प्रश्नासारख्या महत्त्वाच्या विषयावर होती. पण खरं सांगायचं तर, या बैठकीत नक्की काय घडलं हे अजून बाहेर आलेलं नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सीमा प्रश्नावर नक्की कोणत्या प्रमुख नेत्यांना बोलावले होते? शिवसेना ही सीमाप्रश्न चळवळीतील आणि संघर्षातील एक मुख्य पक्ष आहे; मग आम्हाला का माहिती नाही? तिथं नेमकी काय चर्चा झाली? सुप्रीम कोर्टात आपल्या बाजूने लढणारे वकील त्या बैठकीला का उपस्थित नव्हते? हा खटला सुप्रीम कोर्टात अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तिथला मराठी माणूस ज्या हालअपेष्टा सहन करतोय, त्याची आपल्या मुख्यमंत्र्यांना कितपत जाणीव आहे? हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची नक्की काय भूमिका आहे? कालच्या बैठकीत काय ठरले, पुढच्या बैठकीची तारीख काय दिली, की फक्त नेहमीप्रमाणे 'तारीख पे तारीख' सुरू आहे?" असेही राऊत यांनी सांगितले.
शरद पवार आणि माझे एकमेकांवर खूप प्रेम आहे, मी त्यांच्याशी कधीही आणि कोणत्याही विषयावर थेट बोलू शकतो. मात्र, सध्याचा विषय आमच्या पक्षासाठी अत्यंत गंभीर आहे. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांना आम्ही कधीही मान-सन्मान देणार नाही. आमच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांच्या कार्यालयात किंवा त्यांच्या छताखाली आम्ही आमच्या पक्षाच्या बैठका कधीच घेणार नाही, असेही राऊत म्हणाले.
शरद पवार हे कधीही एनडीए (NDA) सोबत जाणार नाहीत, याची मला पूर्ण खात्री आहे. या संदर्भात मी 'सामना' वृत्तपत्रात अग्रलेखही लिहिला आहे. पवार साहेबांच्या विचारधारेवर शंका घेण्याचे मला काहीच कारण नाही, कारण मी त्यांना अतिशय जवळून पाहिले आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षात झालेल्या गद्दारीबद्दलही मी याच तीव्रतेने आणि संतापाने बोललो होतो. गद्दारांना कोणतीही माफी असू शकत नाही. जर राज्यातील मोठे नेतेच अशा गद्दारांना प्रतिष्ठा देऊ लागले, तर महाराष्ट्राची बदनामी होईल. महाराष्ट्राला लागलेला हा गद्दारीचा कलंक पुसून काढणे अत्यंत गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.
जनतेच्या पैशातून एखादा प्रकल्प सुरू करायचा, तो मूळ खर्चापेक्षा जास्त पैसे खर्च करून रेंगाळत पूर्ण करायचा आणि अखेर तो प्रकल्प जेव्हा कोसळतो, तेव्हा आवाज उठवणाऱ्या जनतेचीच चेष्टा करायची? आपल्या हक्कासाठी बोलणाऱ्या जनतेला 'भाडोत्री' किंवा 'कुत्रे' म्हणणे, हे फक्त एखाद्या क्रूर सुलतानाच्या राजवटीतच घडू शकते. विशेष म्हणजे, जेव्हा जनतेचा असा अपमान केला जात होता, तेव्हा या सुलतानासोबत असलेले त्याचे 'निजाम' (चेलेचपाटे) सभागृहात हसत बाक वाजवत होते. महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांचे संस्कार काय आहेत, ते गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राने अनुभवले आहे. तुम्ही जनतेला कुत्रा म्हणत आहात. कुत्र्यांना हाडे टाकून तुम्ही मतं घेतली आहेत का? आणि जे भाडोत्री टट्टू आहेत त्यांना विकत घेऊन तुम्ही सत्तेवर आलात का? देवेंद्र फडणवीस एखाद्या सुलतानासारखे वागत आहेत; मोगल काळातले सुलतान असे वागत होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये एका प्रकारे आणीबाणी घोषित केलेली आहे, अशी बोचरी टीकाही राऊतांनी केली.
डॉक्टरांना अवघ्या आठ तासांपूर्वी मारहाण करताना या माणसाची प्रकृती एकदम उत्तम होती. त्याच्यात प्रचंड ऊर्जा होती, तो टनाटण उड्या मारत होता आणि टेबलावर उभे राहून शिव्या घालत होता. मग पोलिसांनी अटक केल्या-केल्या अचानक त्याची प्रकृती कशी काय बिघडली? त्यामुळे ज्या डॉक्टरांनी त्याला असे खोटे प्रमाणपत्र दिले, त्यांच्यावर आणि त्या हॉस्पिटलवर कडक कारवाई झालीच पाहिजे. मी खात्रीने सांगतो की हे प्रमाणपत्र पूर्णपणे बनावट आहे. डोंबिवली आणि कल्याण भागात तर हे मोठ्या प्रमाणावर चालते. आता या आरोपीच्या आजारपणाचे सर्टिफिकेट डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे का, हे तपासून पाहिले पाहिजे. मुख्यमंत्र्यांना जर खरोखरच काही चांगले काम करायचे असेल, तर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.