Sanjay Raut on Eknath Shinde : "मुंबईत एक चोर बाजार आहे. दिल्लीतही एक चोर बाजार आहे. आता मोदी-शहांनी यांनी पक्ष चोरणारा तिसरा चोरबाजार काढलाय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष हा नरेंद्र मोदींची बेनामी कंपनी आहे. शिंदे दिल्लीच्या चरणी थैल्या अर्पण करत आहेत तोपर्यंत त्यांचा पक्षाचे अस्तित्व टिकणार आहे, अशी बोचर टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (दि. १) माध्यमांशी बोलताना केली. आरएसएस आणि बाळासाहेब ठाकरे यांचाच खरा दसरा मेळावा होता. आता उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडे सर्व जनतेचे लक्ष वेधले आहे, असा दावाही त्यांनी केला.
"एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कधी स्थापन केली?" असा सवाल करत म्हटले की, जोपर्यंत शिंदे गट दिल्लीच्या चरणी 'थैल्या अर्पण' करत आहे, तोपर्यंतच त्यांचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांना मान्य असते, तर त्यांनी कधीच दिल्लीच्या सरकारसमोर लाचारी पत्करली नसती. बाळासाहेब ठाकरे कधीही निर्णय घेण्यासाठी दिल्लीत गेले नाहीत, असे म्हणत राऊत यांनी शिंदे गटाच्या दिल्लीवरील निर्भरतेवर टीका केली.
राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आगामी दसरा मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. "आरएसएस आणि बाळासाहेब ठाकरे यांचाच खरा दसरा मेळावा होता. आजही राज्यातील जनता बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना मानते आणि दुसऱ्या कोणालाही जनता शिवसेना मानत नाही. बाळासाहेबांनी कधीही पक्ष दिल्लीच्या चरणी अर्पण केला नव्हता, असे सांगत राऊत म्हणाले की, यंदाच्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडे राज्यातील सर्व जनतेचे लक्ष वेधले आहे.