Sanjay Raut on Kalyan Dombivli Politics
मुंबई : "कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडी उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे. राज ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. ईडी काही लोकांच्या मागे आहे. तिकडे तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतीलच, पण तुम्ही त्यासाठी पक्षाला वेठीस धरणे आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे," अशा शब्दांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेच्या साथीने सत्तास्थापन करण्याच्या हालचालीवर भाष्य केले.
संजय राऊत म्हणाले की, काही मिळाले नाही तर मी पक्ष सोडून जातो, अशा मानसिकतेत काही लोक असतात, असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच राजकारणातील 'मानसिक अस्थिरतेचा' हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत. 'मला आत्ताच काहीतरी हवेय' आणि मग शहराचा विकास, गावाचा विकास, राज्याचा विकास, देशाचा विकास आणि उद्या जगाचा विकास या नावाखाली पक्षांतर वाढत आहे. माझ्यावर जेव्हा ईडीचे संकट आले, तेव्हा मी स्वतः पक्षाला वेठीस धरले नाही; मी त्या संकटाचा सामना केला. आजही माझ्यावर अनेक संकटे आहेत, माझी प्रकृती अत्यंत खराब आहे. मी आताच ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलो आहे."
महाराष्ट्रामध्ये अशा पक्षांतराची कीड वेळीच रोखणे हे न्यायालयाचे काम असले. आज पुन्हा पक्षांतराच्या संदर्भात सुनावणीची तारीख ठरलेली असताना सुनावणी घेतली नाही आणि परत एकदा सुनावणी पुढे ढकलली. यालाच देशाच्या ऱ्हासाला हातभार लावणे म्हणतात.
कल्याण-डोंबिवलीमधील राजकीय घडामोडीने राज ठाकरे हे खूप व्यथित आहेत, असा दावा करत स्थानिक लोकांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे जो निर्णय घेतला आहे, ती पक्षाची भूमिका नाही. जर स्थानिक लोकांनी पक्षाच्या विरोधात निर्णय घेतला असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. काँग्रेस अंबरनाथमध्येही तसेच झाले; तेथील नगरसेवक भाजपसोबत गेले, तर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. आमच्या पक्षातही जे पक्षविरोधी कारवाई करतात, त्यांना आम्ही काढून टाकतो. महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्या शिंदेंसोबत जर कोणी 'विकासाच्या' नावाखाली जात असेल, तर ते लोक बेईमान आहेत. जर देशाचे सर्वोच्च न्यायालय राजकीय दबावाखाली काम करणार असेल आणि संविधानानुसार निर्णय देण्याऐवजी फक्त 'तारीख पे तारीख' देणार असेल, तर जनतेचा विश्वास कोणावर राहील?, असा सवालही त्यांनी केला.