Sanjay Raut Admitted to Hospital :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना अचानक प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यांना मुंबईतील मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राऊत हे काही वेळापूर्वीच भांडूप येथील त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना दिसले होते. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नसून, गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीत होत असलेल्या चढ-उतारांमुळे त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राऊत यांच्यावर सध्या फोर्टीस रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत थोडी खालवली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते तपासणीसाठी गेले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे केवळ रुटीन चेकअप असल्याने, तपासण्या पूर्ण झाल्यावर त्यांना आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळात अतिशय सक्रिय असलेल्या राऊत यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातमीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रुटीन चेकअपसाठी ते रुग्णालयात गेले असल्याची माहिती समोर आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीबद्दल अधिकृत तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.