मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुमारे 6 वर्षांचा नर बिबट्या बिट्टू याचा 21 मार्च 2026 रोजी दीर्घकालीन आजारामुळे मृत्यू झाला. या बिबट्याला परिवहन मंत्री यांनी दत्तक घेतले हेोते. बिट्टू 4 डिसेंबर 2019 रोजी ठाणे वनविभागातील येऊर परिसरातून काही दिवसांचा असताना वाचवण्यात आलेला बछडा होता. त्याचे संगोपन व देखभाल उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.
काही महिन्यांपासून त्याच्यात आजाराची लक्षणे दिसून येत होती आणि त्याच्यावरील लक्षणांनुसार उपचार करण्यात येत होते. सर्वतोपरी वैद्यकीय उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत गेला. त्यानंतर त्याच्यात अंतर्गत गंभीर गुंतागुंत निर्माण झाली आणि दिनांक 21 मार्च 2026 रोजी त्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय पथकाद्वारे करण्यात आलेल्या सविस्तर शवविच्छेदनात मूत्रपिंडांमध्ये सिस्ट्स आढळून आल्या असून,
प्राथमिक स्थूल विकृतिशास्त्रीय तपासणीत मूत्रपिंड विकारामुळे बाकीचे अवयव निकामी होण्याची शक्यता दर्शविण्यात आली होती. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले असून जैविक नमुने पुढील हिस्टोपॅथॉलॉजिकल व पुष्टीकरणात्मक तपासणीसाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय उद्यान विभागाकडून देण्यात आली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पिंजऱ्यांमध्ये एकूण 24 बिंबटे होते. यापैकी एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने आता 23 बिबटे पिंजऱ्यांमध्ये बंदिस्त आहेत. यापैकी 8 नर, तर 15 माद्या आहेत. तसेच नैसर्गिक अधिवासात 50 च्यावर बिबटे मुक्त संचार करत आहेत.डॉ. विनया जंगले, पशुवैद्यकीय अधिकारी, नॅशनल पार्क