मुंबई : काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याशी निगडित राजगड सरकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकारने थकहमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या साखर कारखान्याला 402 कोटींचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संग्राम थोपटे यांचा राजगड सहकारी साखर कारखाना अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत आहे. भोर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संग्राम थोपटे यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या साखर कारखान्याला मदत मिळावी म्हणून त्यांनी हा प्रवेश केला होता. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला अजित पवारांनी विरोध केला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय रेटून नेल्याचे समजते.
राजगड साखर कारखान्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे. कारखान्याची यंत्रणा देखील जुनी झाली आहे. कर्मचार्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात थकीत आहे. या सर्व आर्थिक अडचणीमुळे हा कारखाना सध्या बंद पडलेला आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याने खेळत्या भांडवलासाठी सादर केलेल्या 499 कोटी 15 लाख रुपयाच्या मार्जिन मनी कर्ज मागणीतील 402 कोटी 90 लाख रुपयांच्या कर्जास मान्यता देण्यात आली आहे.
या प्रस्तावामध्ये साखर प्रकल्प आधुनिकीकरण व विस्तारिकरण, आसवणी प्रकल्प उभारणी, सहवीज निर्मिती प्रकल्प आणि बायो सीबीजी प्रकल्प उभारणीसाठी 327 कोटी 25 लाख रुपये, विविध बँकांच्या कर्ज परतफेडीकरिता 67 कोटी 23 लाख रुपये, यंत्रसामग्री दुरुस्ती आणि देखभाल खर्च भागविण्यासाठी 8 कोटी 42 लाख रुपयांचा समावेश आहे.
मार्जिन मनी लोन मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यापुर्वी राजगड साखर कारखान्याने केंद्र सरकारकडून प्रकल्प विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारी मंजुरी घ्यावी. तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून पुर्व परवानगी घ्यावी. त्याबरोबर 25 जून, 2025 च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करावे, या अटींवर कारखान्या प्रस्तावावर मान्यता देण्यात आली आहे.
अहिल्यानगर येथिल प्रताप ढाकणे यांनाही दिलासा
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास देखील 39 कोटी 88 लाख रुपयांचे मुदत कर्ज राज्य सहकारी बँकेकडून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. दिवंगत माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांनी हा साखर कारखाना उभा केला होता. त्यांचे पुत्र माजी आमदार प्रताप ढाकणे हे त्याचे कामकाज पहात आहेत. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत आहेत. मात्र त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा दिलासा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रताप ढाकणे हे कधीही शरद पवारांची साथ सोडू शकतात, अशी चर्चा आहे.
थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीसही मंजुरी
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 99 एकर 27 आर जमीन विक्रीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार आवाराकरिता खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सरफेसी अॅक्टनुसार यशवंत सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करता यावा यासाठी कारखान्याच्या 26 फेब्रुवारी 2025 रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना विक्री करावी आणि विविध बँका, कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि शासकीय देणी भागवावी असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखान्याची जमीन रेडीरेकनर दरानुसार 231 कोटी 25 लाख रुपयांना विक्री करण्यास मान्यता देण्यात आली.