तुषार झारेकर
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल "मला नथुराम गोडसे व्हावं लागेल," असे वादग्रस्त विधान करून चर्चेत आलेले कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी आता आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
थोरात यांच्यावर हल्ला करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, तर संगमनेरमध्ये आपल्या कीर्तनावर झालेल्या हल्ल्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना अंतर्मुख करण्यासाठी प्रतिकात्मक रूपात गोडसेंचा उल्लेख केल्याचा दावा भंडारेंनी केला आहे.
संगमनेर येथे १६ ऑगस्ट रोजी झालेल्या कीर्तनावेळी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संग्राम भंडारे यांनी केला होता. "कीर्तनकारांवर असे हल्ले होणे ही धोक्याची घंटा आहे," असे ते म्हणाले. मात्र, या गंभीर घटनेचे बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केले, असा आरोप करत भंडारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर, "या हल्ल्याचे गांभीर्य बाळासाहेबांच्या लक्षात यावे, यासाठी मला नथुराम गोडसे व्हावे लागेल," असे विधान त्यांनी केले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
आपल्या स्पष्टीकरणात भंडारे यांनी नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेवरही भाष्य केले. ते म्हणाले, "मुळात नथुराम गोडसे म्हटलं की लोकांना फक्त बंदूक आठवते. पण तसे नाही, उलट गोडसेंचा अभ्यास करायला हवा. त्यांचे हिंदुत्ववादी विचार समाजासमोर यायला हवेत. गेल्या ७५ वर्षांत हे विचार कोणाच्या घरात पोहोचू दिले गेले नाहीत." गोडसे यांच्या विचारांची बाजू उचलून धरत, केवळ एका कृतीमुळे त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व दुर्लक्षित केले जात असल्याचे संकेत त्यांनी दिले. याचवेळी, लॉरेन्स बिष्णोईच्या उल्लेखावरही त्यांनी खुलासा केला. "दाऊद विरोधात पर्याय म्हणून लॉरेन्स बिष्णोईचं उदाहरण द्यावं लागेल. पण मी तरुणांना बिष्णोई व्हा, असा सल्ला दिलेला नाही. जर आमच्या अंगावर कोणी आले, तर हिंदूंमध्येही लॉरेन्स बिष्णोई आहेत, हा केवळ एक इशारा होता," असे भंडारे यांनी स्पष्ट केले.
संग्राम भंडारे यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रतिमेवरही आपले मत मांडले. "वारकरी संप्रदायाकडे केवळ शांततेचं प्रतीक म्हणून पाहिले जाते, पण तसे नाही. या संप्रदायाचे दोन अंग आहेत. एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा, हे हिंदू धर्माचे तत्त्व नाही," असे म्हणत त्यांनी आक्रमक हिंदुत्वाची एकप्रकारे भलावण केली. संग्राम भंडारे यांनी आपल्या स्पष्टीकरणातून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी, त्यांच्या वक्तव्यांमुळे नथुराम गोडसे, वारकरी संप्रदायाची ओळख आणि राजकीय टीकेची भाषा यावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात कसे उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.