मुंबई

संजय राऊत-पटोले यांच्यात सांगली लोकसभेवरून जुंपली

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होण्याची शक्यता विविध एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली. त्यावरून आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. सांगलीच्या जागेबाबत नंतर बोलणारच आहे. आम्ही गोट्या खेळायला बसलो नाही. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली. त्यावर, संजय राऊत अतिविद्वान आहेत. याशिवाय ते कालच लंडनहून आले असून तिथे जास्तीचे काय शिकून आले ते माहिती नाही, असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

कोण अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय यावर नंतर बोलेन : संजय राऊत

सांगलीत ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्यापासून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चकमकी झडत राहिल्या. त्यातच काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. विशाल पाटील यांच्या बंडखोरीला स्थानिक काँग्रेस नेत्यांनी रसद पुरवली. बंडखोरांवर कारवाई झाली नसल्याने ठाकरे गटातही नाराजीची भावना होती. त्यातच आता एक्झिट पोलमध्ये विशाल पाटील यांची सरशी होत असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन. मी त्याबाबत बोलणारच आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय, हे आम्हाला माहिती आहे. मी त्यावर नंतर बोलेन. मी प्रत्येक गोष्ट बोलणारच आहे. आम्हीसुद्धा इथे गोट्या खेळायला बसलेलो नाहीत. आमचेही संपूर्ण आयुष्य राजकारणातच गेले आहे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे, असे संजय राऊत म्हणाले. याशिवाय राऊतांनी ठाकरे गटाच्या मुखपत्रात गेल्या 70 वर्षांत भारतीय लोकशाहीचा कचरा केल्याची टीकाही केली होती.

ते ज्या शाळेत शिकले, ती काँग्रेसने उभारली : पटोले यांचे प्रत्युत्तर

सांगली आणि लोकशाहीबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानांचा काँग्रेसकडून नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. इथे कोणीही गोट्या खेळायला बसलेले नाही. सगळेजण राजकारण करायला आलेले आहेत. तुम्ही शंभर टक्के राजकारण करत असाल; पण आम्ही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करतो. त्यामुळे संजय राऊतांच्या वक्तव्यावर मी जास्त बोलणार नाही, अशा शब्दांत पटोले सांगलीवरून राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. तर लोकशाहीचा कचरा या विधानावर, संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली होती. त्यांच्या गावात पिण्याचे पाणी, रुग्णालय काँग्रेसने निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. अतिविद्वान संजय राऊतांवर काय प्रतिक्रिया देणार! कालच ते लंडनवरून आले आहेत. तिकडून अजून काय जास्त शिकून आले ते मला माहिती नाही. त्यांच्यावर तिकडच्या थंडीचा परिणाम झाला की देशातील उष्णतेचा हे मला माहिती नाही, असा खोचक टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT