मुंबई : मराठी भाषा, स्थानिक रोजगार आणि भूमिपुत्रांना न्याय या मुद्द्यांवर सतत महायुती सरकारवर हल्लाबोल करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे त्यांच्या ‘इंदुरी चाट आणि बरंच काही’ हॉटेलवरून भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली आहे. या हॉटेलचा कुक परप्रांतीय, हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय. नाव देवनागरीत लिहिले म्हणून मराठी ? असा सवाल भाजपकडून करण्यात येत आहे.
देशपांडे यांनी दादरमध्ये ‘इंदुरी चाट आणि बरंच काही...’नावाने उपाहारगृह सुरू केले आहे. या उपाहारगृहात मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील पारंपरिक खाद्यपदार्थ दिले जातात. याचा व्हिडीओ खुद्द देशपांडेंनी त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केला होता. याच पार्श्वभूमीवर, भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक पेजवरून देशपांडेंवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, या हॉटेलचा कुक परप्रांतीय, या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय. नाव देवनागरीत लिहिले म्हणून मराठीपण? अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.
संदीप देशपांडेंनी दोन दिवसांपूर्वी मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, खानाची भीती दाखवून भैय्या आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार, असे म्हटले होते.‘बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरणार’ असे आव्हान त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना दिले होते. याचाच राग मनात ठेऊन भाजपने देशपांडे यांना आता उपाहारगृहावरून डिवचले.
भाजपला महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही. बौद्धिक दिवाळखोरांच्या पक्षाकडून काय अपेक्षा करणार. ट्रोल करणार्यांचे दावे पाहून त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची कल्पना येते. तसेच गंमत वाटते की, या लोकांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही. इंदोर या शहराचा विकास हा राजे होळकरांमुळे झाला, याची माहिती भाजपच्या लोकांना नाही.- संदीप देशपांडे, मुंबई अध्यक्ष, मनसे