Mumbai Nagpur Samruddhi Highway ITMS
मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (MSRDC) ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे १७०० कोटींच्या ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
काय आहे ITMS प्रकल्प?
ITMS (Intelligent Traffic Management System) ही एक हायटेक प्रणाली आहे जी ट्रॅफिक उल्लंघन, वाहनांची हालचाल आणि आपत्कालीन परिस्थितींवर लक्ष ठेवते. या प्रकल्पासाठी १७०० कोटी रूपये एकूण खर्च केला जात आहे. ७०१ किमी लांबीच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ही प्रणाली कार्यान्वित होईल.
डिसेंबर २०२२ मध्ये समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत १७६ मोठ्या अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये २७८ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले. या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्यासाठी आणि आपत्कालीन मदत तत्काळ मिळावी यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये तत्त्वतः मंजुरी दिली होती. मार्च २०२४ मध्ये निधी मंजूर करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दोन खासगी कंपन्यांच्या संयुक्त गटाला काम दिले. प्रकल्पाच्या देखरेखीकरिता जपानमधील एक प्रमुख अभियांत्रिकी कंपनी आणि तिची भारतीय उपकंपनी यांना नियुक्त करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तत्काळ मदत मिळवणे शक्य होणार आहे.
ITMS अंतर्गत वाहतूक नियमांचे १७ प्रकार ओळखता येणार आहेत. अतिवेग, मोबाईलवर बोलणे, बेकायदेशीर पार्किंग, लेन कटिंग इत्यादी. या उल्लंघनांवर त्वरित कारवाई करता येणार आहे.
२. २४x७ नियंत्रण केंद्रे आणि ड्रोन पाळत यंत्रणा
महामार्गावर प्रत्येक १ किमीवर डे-नाईट कॅमेरे असतील. तर प्रत्येक २ किमीवर आपत्कालीन कॉल बूथ आणि ड्रोनद्वारे पाळत असेल.
३. १० वाहतूक व्यवस्थापन केंद्रे
महामार्गावर १० ITMS नियंत्रण केंद्रे कार्यरत राहणार असून ती ऑप्टिक फायबरद्वारे जोडली जातील. ठाणे जिल्ह्यातील अमणे येथे मुख्य केंद्र असणार आहे. ७ प्रादेशिक आणि २ बोगद्यात केंद्र असणार आहेत.
४. तत्काळ आपत्कालीन सेवा
रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यासाठी मोबाईल रेडिओ सिस्टीम असेल. या प्रणाली यामुळे अपघातानंतरची मदत त्वरीत मिळू शकणार आहे.
५. टोल संकलन अधिक कार्यक्षम
महामार्गावरील ७४ टोल प्लाझांवर RFID आधारित प्रणालीद्वारे टोल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे टोल वसुली अधिक पारदर्शक आणि जलद होईल.
६. चालकांना माहिती
चालकांना रिअल टाइम वाहतूक, हवामान व रस्त्याची माहिती देणारे डिस्प्ले बोर्ड असतील.
समृद्धी महामार्गाच्या ७०१ किमीपैकी ६२५ किमीचा भाग आधीच कार्यान्वित झाला आहे. उर्वरित ७६ किमीचा अंतिम टप्पा (इगतपुरी ते अमणे, ठाणे) आता पूर्ण करण्यात आला असून, वाहतुकीस लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. महामंडळाने ऑप्टिकल फायबर आणि विजेच्या केबल्सचे अंडरग्राउंड जाळे बसवण्याचे काम सुरू केले असून, ५०० किमी लांबीचे केबल डक्ट्स बसवले आहेत. हा प्रकल्प २१ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.