संभाजीराजे मुंबईत धडकले; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट  file photo
मुंबई

Chhatrapati Sambhajiraje | संभाजीराजे मुंबईत धडकले; कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम ८ वर्ष होऊनही सुरु झालेले नसल्याने स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, अशी हाक देत संभाजीराजे यांनी आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

चला... अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला; संभाजीराजेंची पोस्ट चर्चेत 

मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप - शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याचे बोलले गेले. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला चला, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले होते.

संभाजीराजेंचा ताफा पोलिसांनी अडवला

रविवारी दुपारी संभाजीराजे कार्यकर्त्यांसह गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले. मात्र तिथे पोहचण्याआधीच रिगल सिनेमाजवळ पोलिसांनी त्यांचा ताफा रोखला. यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दडपशाही चालणार नाही. ८ वर्षात स्मारकाचं काहीचं झालं नाही. शिवरायांच्या स्मारकाबाबत जनतेला कळलं पाहिजे. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडा, प्रशासन आम्हाल का अडवणार? असे संभाजीराजे म्हणाले. काही वेळानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या स्वराज्यच्या कार्यकर्त्यांना सोडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT