मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईच्या ट्रॅफिक नियंत्रण कक्षाला अभिनेता सलमान खानसाठी एक धमकीचा संदेश आला आहे. संदेश पाठवणाऱ्याने स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई गँगमधील असल्याचे म्हटले आहे. यामध्ये सलमान खानला जीवंत राहायचे असेल तर खंडणीची मागणी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी हा संदेश गंभीरतेने घेतला आहे. मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या या संदेशाप्रकरणी वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Salman Khan)
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॅट्सॲप नंबरवर एक धमकीचा फोन आला आहे. ज्यामध्ये अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत बर्याच काळापासून सुरू असलेला वाद संपवायचा असेल तर ५ कोटी रूपये देण्याची मागणी केली आहे. संदेश पाठवणाऱ्याने सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यामध्ये समेट घडवून आणणार असल्याचे म्हटले आहे. जर पैसे दिले नाहीत तर, सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट करण्याची धमकी देण्यात आली आहे.
अभिनेता सलमान खानला धमकी देताना लिहिलंय की, जर सलमान खानला जिवंत राहायचे आहे आणि लॉनेन्स बिश्नोई गँगसोबतच वैरत्व संपवायचे असेल तर त्याने ५ कोटी रूपये द्यावेत. जर पैसे दिले नाहीत तर सलमानची अवस्था बाबा सिद्दीकींच्याहीपेक्षा वाईट होईल. या संदेशाला मुंबई पोलिसांनी गंभीरतेने घेतले असनू तपासाला पोलिसांनी सुरूवात केली आहे.
या आधी १२ ऑक्टोबर रोजी रात्री बांद्राच्या निर्मल नगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. ते त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून बाहेर येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तीन लोकांनी मिळून हे कृत्य केल्याचे समोर आले. त्यांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले तेंव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले.