मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वांद्रे येथील ११ व्या मजल्यावरील आलिशान घरात गुरुवारी पहाटे घुसून एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या चाकूहल्ल्यात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack News) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात सलग दोन मोठ्या शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, हा चोरीचा प्रयत्न होता, असे खान कुटुंबीयांनी आणि पोलिसांनीही म्हटले असले; तरी सैफच्या घरात झालेल्या झटापटीतही या अज्ञात हल्लेखोराने सैफकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगितले जात असल्याने या चोरीच्या प्रयत्नाला आता खंडणीचे वळण लागले असून, या हल्ल्याने बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान, गुरुवारी पहाटे नेमके काय घडले? याबाबत सैफ अली खानच्या कर्मचाऱ्याने प्रसंग कथन केला आहे. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, एक व्यक्ती अचानक वांद्रे येथील घरात घुसला. तो सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा लहान मुलगा जहांगीरच्या खोलीकडे जाताना दिसला. यादरम्यान त्याला घरातील एका कर्मचाऱ्याने पाहिले. कर्मचाऱ्याने मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी संशयिताला रोखण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही हातात शस्त्रे घेऊन आलेल्या हल्लेखोराने तिच्यावर हल्ला केला. घरातील आरडाओरड ऐकून लगेच सैफ अली खान आणि करीना कपूर खोलीत धावले. यादरम्यान झालेल्या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला.
पोलिस तक्रारीत सैफच्या घरातील कर्मचारी एलियामा फिलिप (५६) हिने गुरुवारी पहाटे झालेल्या भयानक हल्ल्याची सविस्तर माहिती दिली आहे.
''१५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, मी सैफ अली खानचा लहान मुलगा जहांगीर उर्फ जेहबाबा (४ वर्ष) याला जेवू घातले आणि झोपवले. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास मला आवाजाने जाग आली. बाथरूमचा दरवाजा खुला असून लाईट सुरु असलेली दिसली. करिना मॅडम जेहला पाहायला आल्या असतील असे मला वाटले. काहीही न विचारता मी झोपले. बाथरूममध्ये कोण आहे? हे तपासण्यासाठी मी पाहिले तेव्हा आतून एक व्यक्ती बाहेर आला आणि तो जेहच्या खोलीकडे जाताना दिसला. लगेच मी जेहबाबांकडे गेले. त्यानंतर हल्लेखोराने मला धमकावत, 'कोई आवाज नहीं', असे म्हटले.
त्याचदरम्यान जेहचा सांभाळ करणारी नॅनी जुनू जागी झाली. त्या व्यक्तीने तिलाही आवाज करू नकोस असे बजावले. त्याच्या डाव्या हातात काठी होती आणि उजव्या हातात एक लांब आणि पातळ ब्लेडसारखी धारधार शस्र होते.
जेहला सुरक्षित ठेवण्यासाठी मी त्याला रोखले. पण त्याने माझ्यावर ब्लेडने हल्ला केला. ज्यामुळे माझे दोन्ही हात जखमी झाले. मी त्याला विचारले, "तुला नेमके काय हवे आहे? किती पैसे हवे आहेत?" त्यावर त्याने १ कोटी रुपयांची मागणी केली. आरडाओरड ऐकून करीना मॅडम धावत खोलीत आल्या. सैफ सरांनी त्याला विचारले, “तू कोण आहेस?” तुला काय हवे आहे". यादरम्यान झालेल्या झटापटीत त्या व्यक्तीने लाकडी वस्तू आणि ब्लेडने सैफ सरांवर हल्ला केला.
बुधवारी रात्री दोनच्या सुमारास अत्यंत रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर नितीन डांगे यांनी सांगितले की, सैफच्या पाठीत थोरासिक स्पाईन कॉर्डच्या जवळच भला मोठा चाकू रुतलेला होता. तो काढून टाकण्यासाठी आणि मणक्यातून होणारा स्राव बंद करण्यासाठी तब्बल ६ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. मणक्याजवळ रुतलेला चाकूचा तुकडा हा २.५ इंच लांबीचा होता.
सैफच्या डाव्या हातावर दोन अत्यंत खोल जखमा झालेल्या होत्या. मानेजवळही एक खोल जखम झालेली होती. प्लास्टिक सर्जरी टीमने या जखमा बंद केल्या. या सर्व शस्त्रक्रिया मेंदूशी निगडित आणि प्लास्टिक सर्जरी स्वरूपाच्या होत्या. आता सैफच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. मात्र, झालेल्या शस्त्रक्रियांवर निगराणी ठेवण्यासाठी आणखी एक दिवसासाठी सैफला अतिदक्षता कक्षात हलवण्यात आले आहे. डॉ. डांगे यांनी स्पष्ट केले की, सैफची प्रकृती झपाट्याने सुधारत असून, त्याची बरे होण्याची गती १०० टक्के आहे. सैफवर तातडीने उपचार करणार्या डॉक्टर पथकात डॉ. डांगे यांच्याशिवाय कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन आणि भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी यांचा समावेश होता.
सैफ अली खानसारख्या सेलिब्रिटीच्या ११व्या मजल्यावरील घरात एखादा चोर शिरतो कसा? आणि ‘पद्मश्री’सारखा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या अभिनेत्याची सुरक्षा कुठे होती? असे प्रश्न मुंबईकरांना पडले आहेत. त्यावर पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी हा प्रकार कसा घडला ते सांगितले.
इमारतीसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या फुटेजमध्ये इमारतीतून बाहेर पडणारा हा गुंड स्पष्ट दिसतो. त्याला जेरबंद करण्यासाठी वांद्रे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची १० पथके रवाना झालेली आहेत.
सैफवर हल्ला केल्यानंतर इमारतीतून बाहेर पडताना या हल्लेखोराचा सीसीटीव्ही फुटेजचा फोटो पोलिसांनी माध्यमांना दिला. संकटकाळात बाहेर पडण्यासाठीच्या जिन्यावरून पायर्या उतरताना हा हल्लेखोर दिसतो.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही वेळ २ वाजून ३३ मिनिटे व ५६ सेकंद दर्शवते. टी-शर्ट, जीन्समध्ये असलेल्या या हल्लेखोराने चकाचक दाढी केलेली असून, गळ्यात भगव्या रंगाचा स्कार्फ दिसतो. उतरताना नकळत त्याने सीसीटीव्ही कॅमेर्याच्या दिशेने पाहिले म्हणून त्याचा चेहरा समोर आला.