मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला करणार्या गुंडाचे थेट कनेक्शन सैफच्या घरातील एका कर्मचार्याशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी या हल्ल्यामागे कोणतेही अंडरवर्ल्ड कनेक्शन नसल्याचा निर्वाळाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी दिला.
सैफ अली खान आता ठणठणीत असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला तातडीने रुग्णालयातून घरी पाठवलेले नाही. आणखी दोन-तीन दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्याला दिला आहे. शुक्रवारी त्याला अतिदक्षता कक्षातून विशेष खोलीमध्ये हलवण्यात आले. त्याची प्रकृती झपाट्याने सुधारत असली, तरी त्याने आठवडाभर तरी हालचालींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे, असे सैफवर शस्त्रक्रिया करणारे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले.
सैफच्या जखमांचाही तपशील डॉक्टरांनी दिला. मानेच्या उजव्या बाजूला झालेली जखम 10 ते 15 सेंटिमीटर लांब असून, ती मानेच्या पाठीमागून सुरू होते व उजव्या खांद्यापर्यंत जाते. मानेच्या समोरदेखील तीन ते पाच सेंटिमीटर लांबीची जखम आहे. पाठीच्या कण्याजवळ थोरासिक कॉर्डपासून अगदी नजीक चाकूचे पाते रुतलेले होते. हा वार सर्वात घातक होता. सैफचा हल्लेखोर ‘सत्गुरू शरण’ इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला असला, तरी त्याचा शोध मात्र अजूनही लागलेला नाही. त्याच्यासारखाच दिसणारा एक तरुण शुक्रवारी पकडून वांद्रे पोलिस ठाण्यात आणण्यात आला. त्याचा या हल्ल्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
सैफच्या घराची नीट माहिती असल्याशिवाय हल्लेखोर इतक्या सफाईदारपणे सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीतील बाथरूममध्ये दडून बसू शकणार नव्हता. सैफच्या इमारतीच्या टेरेसवर काम करणार्या दोन कामगारांची चौकशी पोलिसांनी शुक्रवारी केली. विशेष म्हणजे, सैफसारखा सेलिब्रिटी राहत असूनही त्याच्या घरावर पाळत ठेवणारे कोणतेही कॅमेरे बसवलेले नव्हते.
आम्ही अभिमानाने सांगतो की, देशात मुंबईत सर्वात सुरक्षित आहे. मुंबईत आम्ही रात्री दोन वाजतादेखील बिनधास्त रस्त्याने चालू शकतो. असे असताना झालेल्या या हल्ल्याने मोठा धक्का बसला. हा एकूण प्रकार चिंताजनक आहे. मला खात्री आहे की, मुंबई पोलिस या हल्ल्याचा छडा लावतील, असे अभिनेता शाहिद कपूर म्हणाला.