पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्याप्रकरणानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. हल्लेखोरचा कोणत्याही गँगशी संबंध नाही. तसेच बाबा सिद्धकी, सलमान खान यांच्या संबंधित घटनेचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हल्लेखोर घराच्या मागच्या भिंतीवरून चढला होता. चार माळ्याची बिल्डिंग आहे. तिथे सीसीटीव्ही कमी आहेत. एका सीसीटीव्हीतून त्याचा चेहरा समोर आलेला आहे. लवकरच त्याला पकडले जाईल. फक्त सैफ अली खानचा आडनाव खान आहे म्हणून राजकारण काही लोक करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाकावरून फेकून दिले आहे. आता तुम्ही विरोधी बाकावर आहात. पण काहीही बरळत राहाल तर आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. (Saif Ali Khan Attack)
जितेंद्र आव्हाड यांनी इतकं लक्षात घ्यावं की, या घटनेला सामाजिक आणि राजकीय रंग देणे म्हणजे त्यांची राजकारणातील परिपक्वता किती आहे हे लक्षात येते. आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होम डिपार्टमेंट काम करताना मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर आहे. गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात आपण सर्व सेफ आहोत. मुंबई पोलिसांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात, असे ते म्हणाले. (Saif Ali Khan Attack)
मुळात सैफ अली खान यांचा घर चार माळ्याचा आहे. आणि तिथे सीसीटीव्ही नव्हते. तसेच त्या बिल्डिंगमध्ये पोलीस डिपार्टमेंटची कोणतीही सिक्युरिटी नव्हती. तर प्रायव्हेट सिक्युरिटी होती. एका सीसीटीव्हीत आरोपीचा फोटो मिळाला आहे. म्हणून याला कुठलाही धार्मिक आणि सामाजिक रंग देणे चुकीचे राहील. खूनाच्या प्रयत्नाने चोर आला होता, अशी प्राथमिक माहिती दिसून येत नाही. चोरी करण्याच्या उद्देशाने आलेला आणि त्यावेळेस त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यात झटापट झाली, असे प्राथमिक दिसून येते, असे मंत्री कदम म्हणाले.