IIT Bombay Pudhari
मुंबई

Sahil Wakode Case: साहिलच्या समर्थनार्थ एकवटल्या जगभरातील आंबेडकरी संघटना

साहिलच्या कुटुंबीयांची सार्वजनिक माफी मागण्यासह वक्तव्य मागे घेण्याची मागणी; चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांनी भाष्य करू नये

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी आता जगभरातील आंबेडकरी आणि बौद्ध संघटना एकवटल्या आहेत. उत्तर अमेरिका, युरोपसह विविध देशांतील संघटनांनी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांना पत्र पाठवून संस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

साहिलच्या कुटुंबीयांची आणि अनुसूचित जाती समाजाची सार्वजनिक माफी मागावी, साहिलच्या वर्तनाबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर भाष्य करू नये, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

साहिलच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी आयआयटी मुंबईने परीक्षेदरम्यान त्याने मोबाइलचा वापर करून प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर टाकल्याचे जाहीर केले होते. या वक्तव्यामुळे साहिलविषयी एकतर्फी चित्र निर्माण झाले आणि अनुसूचित जाती-जमातींच्या समाजाविरोधातील ऑनलाइन टीकेला प्रोत्साहन मिळाले, असा आरोप संघटनांनी पत्रात केला आहे.

संस्थेने नंतर या तपशिलांच्या प्रसारणाबद्दल खेद व्यक्त केला; मात्र साहिलच्या कुटुंबीयांची किंवा समाजाची सार्वजनिक माफी मागितलेली नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

साहिलच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या अंतर्गत समितीच्या रचनेवरही संघटनांनी आक्षेप घेतला आहे. समितीच्या अध्यक्षपदी संस्थेबाहेरील निवृत्त न्यायाधीश किंवा प्रतिष्ठित व्यक्तीची नियुक्ती करावी, बाह्य सदस्यांचे बहुमत असावे, तसेच अनुसूचित जाती-जमाती समाजातील किमान दोन वरिष्ठ सदस्य आणि दोन विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

साहिलच्या कुटुंबीयांच्या वकिलांना पुरावे सादर करण्याची आणि साक्षीदारांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी. १८ सप्टेंबरच्या घटनाक्रमाचा मिनिटागणिक तपशील देणारा अहवाल दोन आठवड्यांत प्रसिद्ध करावा, असेही पत्रात म्हटले आहे.

परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक कसे झाले, असा सवालही संघटनांनी उपस्थित केला आहे. परीक्षा केंद्र, बाहेरील मार्गिका, अधिष्ठाता कार्यालय आणि वसतिगृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवून ते मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

संस्थेच्या नियंत्रणातील फुटेज समाजमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले, याची माहिती सार्वजनिक करावी आणि ते प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे.

दरम्यान, साहिल वाकोडेच्या कुटुंबीयांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत २४ तास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) आणि सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांना लेखी पत्र पाठवले आहे.

या प्रकरणातील संबंधित व्यक्ती आपल्या पदाचा वापर करून तपासावर परिणाम करण्याची शक्यता असल्याचा आरोपळभ् कुटुंबीयांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT