मुंबई : साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणाचा पोलीस तपास काॅपीच्या अवती भवतीचा फिरत आहे. त्यामुळे या प्रकरणासाठी वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी व साहिलच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या आयआयटी मुंबई संचालक शिरीष केदारे व प्रा. सुर्यनारायण डुला यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी वाकोडे यांचे वकिल ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी सोमवारी केली.
साहिलच्या आई-वडिलांच्या आझाद मैदानातील उपोषणाचा सोमवारी १५ वा दिवस होता. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. इंगळे बोलत होते.
साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु असताना प्रा. डुला हे बाहेर गावी परदेशी पळून गेल्याचा आमचा संशय आहे. त्यांचा तपास पोलिसांनी करावा. यासाठी पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन पाठविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महिला आंदोलकांना मारहाण, गैरवर्तन
आयआयटी मुंबईत रविवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पवई पोलिसांनी महिला आंदोलकांना मारहाण करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप ऑल इंडिया इंडिपेंडेंट शेड्युल्ड कास्ट्स असोसिएशनने साेमवारी येथे मुंबई प्रेस क्लब येथे केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी असोसिएशनने केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल सोनपिंपळे, दिपाली साळवे, आशु विद्रोही, प्राजक्ता केदारे, प्रशांत रणदिवे, श्रीपाद शिंगारे आदींनी भूमिका मांडली.