Gunaratna Sadavarte on Raj Uddhav Thackeray Morcha : तुमची निवडणूक आयोगाच्या संदर्भात काही तक्रार असेल तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करा. राज ठाकरे आतापर्यंत कधी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत का? त्यांच्याकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर निराधार आरोप सुरू आहेत. सारं काही अमित ठाकरेंच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हटवलेल्या फोटोवरून लक्ष विचलित व्हावे म्हणून केले जात आहे, असे आरोप करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का?, असा सवाल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज (दि. ३०) माध्यमांशी बोलताना केला.
ॲड. सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे भारतीय राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत. कायद्याने सीमा आखून दिली आहे. मुंबईत आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढू शकत नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की तिथे बंदी आहे. मोर्चा नक्की कशासाठी, शपथ घेऊन सांगा, असे आवाहनही सदावर्ते यांनी यावेळी केले.
मोर्चा काढायचा असेल तर सेना भवन परिसरात काढावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान थांबला पाहिजे. ठाकरे बंधूंचा मोर्चा हा लोकांना मूळ प्रश्नांवरून बगल देण्यासाठी आहे. राज-उद्धव ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल करत हा मोर्चा निघू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.
४ ऑक्टोबरच्या मोर्चाविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे. या मोर्चामुळे टॅक्सीवाले, वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थी असोत की मुंबई लोकलचे काय होईल, असे सवालही त्यांनी केले. आयआयटी मुंबईमधील एका विद्यार्थ्याने जीवन संपवले, याबद्दल राज ठाकरे किती गंभीर आहेत? उद्धव आणि राज ठाकरे वाकोडेच्या आई-वडिलांना भेटले का? तुमचं राजकारण कोणालाही न पटणारे असल्याचेही ते म्हणाले.
सोशल मीडिया पेजवाल्या अभिजित दीपकेला वाकोडे कुटुंबीयांची चिंता नाही का? आता २ ऑक्टोबरला सीजेपीचे जेलभरो आंदोलन आहे. मात्र तिथे फक्त घटनात्मक कार्यक्रम होऊ शकतात. बाकी कोणतेही आंदोलन होऊ शकत नाही. घटनात्मक पद्धतीने जेलभरो आंदोलन होऊ शकत नाही. ते कायद्याच्या तत्त्वात बसू शकत नाही. आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण अमर्याद सूट नाही. २ तारखेच्या आंदोलनाला आमचा विरोध असल्याचेही सदावर्ते म्हणाले.
आम्ही सर्वांनी २ ऑक्टोबरच्या आंदोलनास विरोध केला आहे. सर्वजण शिवाजी पार्कला जात असतात. तो शांततापूर्ण झोन आहे. राष्ट्रीय कार्यक्रमासाठी जेलभरो आंदोलन होऊ शकत नाही. कॉरकोज जनता पार्टी राजकीय पक्ष नाही. ती सोशल मीडिया चालवणारी कंपनी आहे. संविधानाचे कव्हर दाखवून चालत नाही, कायदे माहीत पाहिजेत. २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील मोर्चा होऊ शकत नाही, असा दावाही सदावर्ते यांनी केला.