Antilia bomb case Sachin Vaze Update
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आला. वाझेच्या जामीन आदेशावर स्थगिती न मिळाल्यास बुधवारी सचिन वाझे तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये अंबानी कुटुंबाच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. यानंतर काही दिवसांनी कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळ खाडीत सापडला होता. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला होता. याप्रकरणी वाझे सध्या तुरुंगात आहे.
मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयात सचिन वाझेच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने दीर्घकाळ (साडे पाच वर्ष) तुरुंगात असल्याच्या मुद्द्यावरुन वाझेला जामीन मंजूर केला.
कोण आहे सचिन वाझे?
सचिन हिंदुराव वाझे हा वादग्रस्त पोलीस अधिकारी म्हणून कायम चर्चेत राहिला. कोल्हापूर जिल्ह्यात 22 फेब्रवारी 1972 रोजी त्याचा जन्म झाला. 1990 च्या सुमारास वाझे पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाला. गडचिरोलीत काही काळ काम केल्यानंतर तो मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत होता.
सचिन वाझे आणि वाद
घाटकोपर बॉम्बस्फोटप्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. जानेवारी 2003 मध्ये चौकशीनंतर तो बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सीआयडी चौकशीत ख्वाजाचा मृत्यू पोलीस कोठडीत झाल्याचे समोर आले होते. युनूसची चौकशी करणाऱ्यांमध्ये वाझेचा समावेश होता. याप्रकरणी त्याला बडतर्फही करण्यात आले होते.
छोटा राजनचा साथीदार लखनभय्याचे नोव्हेंबर 2006 मध्ये वाशीत एन्काऊंटर करण्यात आले होते. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार प्रदीप शर्मा यांच्यासमेत 22 जणांना अटक करण्यात आली होती. यात वाझेचा समावेश होता.
प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर 2020 मध्ये वाझे पुन्हा पोलीस दलात रुजू झाला. मात्र, अवघ्या वर्षभरातच अँटिलिया प्रकरणात वाझे अडकला.