मुंबई : महायुतीच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट आदी. pudhari photo
मुंबई

Sachin Ahir : शिंदेंचा ‘एक डाव’, ठाकरेंना ‘धोबीपछाड’!

सचिन अहिर अचानक शिंदे गटात; लगेच विधान परिषदेच्‍या ‍उपसभापतिपदाची उमेदवारीही बहाल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ‘ऑपरेशन टायगर’ची धूळ खाली बसत नाही, तोच उपमुख्‍यमंत्री ए‍कनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मंगळवारी आणखी एक जोरदार झटका दिला. ‘ठाकरें’च्‍या खास मर्जीतील विधान परिषद सदस्‍य आ. सचिन अहिर यांनाच शिंदे यांनी आपल्‍या गटात सामील करून घेतले. कानोकान खबर लागू न देता शिंदे यांनी हा संपूर्ण राजकीय डाव खेळल्‍याने सारेच चकित झाले. विधान परिषदेच्या उपसभापतिपदाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताना सचिन अहिर हे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत उपस्थित राहिल्यानंतरच या पक्षांतराची माहिती समोर आली आणि राजकीय खळबळ उडाली.

गेल्‍या तीन-चार दिवसांपासून विधान परिषदेच्‍या उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हे, चंद्रकांत रघुवंशी व कृपाल तुमाने ही तीनच नावे चर्चेत होती. उत्तर महाराष्ट्रातील काही आमदारांनी रघुवंशी यांच्या नावासाठी पत्रही दिले होते. राजकीय वर्तुळाचे लक्ष या नावांकडे असतानाच शिंदे यांनी अचानक सचिन अहिर यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरून घेत सर्वांनाच धक्का दिला. कालपर्यंत अधिवेशनात सभागृहात ‘उबाठा’साठी आक्रमकपणे बोलणारे सचिन अहिर शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरतील याची खबर ठाकरे गटाला लागणार नाही, याची खबरदारी घेतली गेली होती.

‘ठाकरें’च्या मर्जीतील नेता अशी ओळख असलेल्‍या अहिर यांनी अचानक पलटी मारणे हा ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का होय. यापूर्वीच पक्षाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता विधान परिषदेतील महत्त्वाचे नेते अहिर यांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने ठाकरे गटातील आणखी काही आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनाही बळ मिळाले आहे.

वरळीत आदित्य ठाकरेंची कोंडी

वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या संघटनात्मक बळामागे सचिन अहिर यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ सचिन अहिर आणि आमदार सुनील शिंदे सांभाळतात. त्यापैकी अहिर यांनी आदित्य ठाकरे यांची साथ सोडली. दक्षिण मुंबईत मजबूत जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या अहिर यांच्या पक्षांतराचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दिसू शकतो. अहिर यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला दक्षिण मुंबईत नवे राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

अपात्रता टाळण्यासाठी 'नीलम गो-हे' पॅटर्न !

सचिन अहिर यांच्यावर अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आधीचा यशस्वी ठरलेला नीलम गो-हे पॅटर्न राबविण्याचे ठरविले आहे. २०१९ मध्ये सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिक्सेना अखंड होती. २०२२ मध्ये त्यांना ठाकरेंनी विधान परिषदेवर संधी दिली. त्यावेळीही शिवसेना अखंड होती. ते अखंड शिवसेनेकडून विधान परिषदेवर गेले होते. सचिन अहिर यांना प्रवेश देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'नीलम गो-हे' पॅटर्न वापरला आहे.

गो-हे २०१९ मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवडून आल्या. २०२० मध्ये ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी दिली. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण, जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यांनी ४० आमदारांसह ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. पक्ष आणि चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून गेले आणि शिवसेनेची सूत्रे शिंदेंकडे गेली. त्यानंतर वर्षभरात नीलम गो-हेंनी ठाकरेंची साथ सोडली. पण त्यांचे उपसभापतिपद कायम राहिले. आता अहिर यांना उपसभापतिपदाची उमेदवारी देताना हेच सूत्र लागू होईल, याची काळजी शिंदे यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

आठवडाभरापूर्वी खासदारांनी षटकार ठोकले. आज आमदार अहिर यांनी षटकार ठोकला. यापुढेही चौकार, षटकार सुरूच राहतील आणि त्यांच्यातील एक एक विकेट पडेल. एकनाथ शिंदे जे करतो ते फुलप्रूफ करतो, त्यामुळे काही अडचण नाही, मी काही खुलासा करणार नाही. पण जे केले ते फुलप्रूफ आहे.
एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT