Sachin Ahir pudhari photo
मुंबई

Sachin Ahir: विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी; विश्वासू व्यक्तीनेच घातला गंडा

२ कोटी ६५ लाखांच्या मुद्देमालावर घरगड्याचा डल्ला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी केल्याप्रकरणी त्यांच्याच घरगड्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी प्रवीण रमेश सोलंकी याला अटक केली. त्याने टप्प्या‍टप्प्या‍ने त्यांच्या घरातून २ कोटी ६५ लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सचिन अहिर यांच्या घरी प्रवीण हा गेल्या २४ वर्षांपासून घरगडी म्हणून काम करत होता.

तो त्यांचा विश्‍वासू नोकर होता. घरासह कार्यालयाची जबाबदारी त्याच्यावर असल्याने त्याला तेथील प्रत्येक वस्तूची माहिती होती. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने घरात टप्प्या‍टप्प्या‍ने चोरी करण्यास सुरुवात केली होती.

गेल्या काही महिन्यांत त्याने घरातील सोन्याचे, हिरेजडीत, चांदीचे दागिने, रोकड आणि इतर वस्तूंची चोरी केली. सुरुवातीला हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र, अलीकडेच अहिर कुटुंबीयांना त्यांच्या कपाटातील काही दागिने मिळत नसल्याचे दिसून आले.

पाहणी केल्यानंतर त्यांना २ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांच्या घरी घरातील व्यक्ती, नोकराशिवाय इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे नोकरावर संशय व्यक्त करून पोलिसांत तक्रार दिली.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी प्रवीणला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने ही चोरीची कबुली दिली. या गुन्ह्यात त्याला इतर काही आरोपींनी मदत केली होती. चोरीचे दागिने विकल्यानंतर त्याने त्यातून आलेली रक्कम त्याच्या सहकार्‍यांना दिली होती. त्यानंतर प्रवीणला पोलिसांनी अटक केली.

सचिन अहिर हे विधान परिषदेचे आमदार असून अलीकडेच त्यांनी ठाकरे शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT