Indian Currency Crash | डॉलर उसळला, रुपया कोसळला! 
मुंबई

Indian Currency Crash | डॉलर उसळला, रुपया कोसळला!

95.58 रुपये डॉलर : सेन्सेक्स, निफ्टीही गडगडले; गुंतवणूकदारांनी दोन सत्रांत गमावले 18 लाख कोटी रुपये

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम आशियातील युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने रुपयासह शेअर बाजारही गडगडल्याचे सोमवारी दिसून आले. डॉलरने मोठी उसळी घेतल्याने रुपया कोसळला. आता डॉलरचा दर 95.58 रुपये झाला असून, हा विक्रमी नीचांक आहे. इंधन दराचा भडका, विविध अभ्यासकांनी महागाई वाढण्याची व्यक्त केलेली भीती, यामुळे सलग दुसर्‍या सत्रात सेन्सेक्स 1,635 आणि निफ्टी निर्देशांक 488 अंकांनी कोसळले. दोन सत्रांतील या अभूतपूर्व घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 18 लाख कोटी रुपये गमवावे लागले.

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 2.22 टक्क्यांनी कोसळून 71,947 अंकांवर विसावला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी निर्देशांक 2.14 टक्क्यांनी घसरून 22,331 अंकांवर थांबला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स 3,326 आणि निफ्टी निर्देशांक 975 अंकांनी आपटला आहे.

पडझडीमुळे रुपयाची गटांगळी

विदेशी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतल्याने एका डॉलरचा भाव 42 पैशांनी कमकुवत होऊन 95.23 रुपयांच्या नीचांकावर बंद झाला. सकाळच्या सत्रात एका डॉलरचा भाव 93.56 रुपयांवर उघडला होता. जवळपास 125 पैशांनी रुपया वधारला होता. शेअर बाजारातील पडझडीने रुपयाने नीचांक गाठला.

कच्चे तेल प्रतिबॅरल 116 डॉलर्सवर

अमेरिका-इस्रायल आणि इराणचे युद्ध गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतूक ठप्प पडली आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या आणि एलएनजीच्या वाहतुकीपैकी 20 टक्के होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. तेलवाहतूक विस्कळीत झाल्याने सोमवारी ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव 3 टक्क्यांनी वाढून 116 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेले असून, यूएस डब्ल्यूटीआयचे दर 101 डॉलर्सवर गेले आहेत.

विदेशी संस्थांची विक्रमी विक्री

युद्धामुळे विदेशी संस्थांनी 27 मार्चपर्यंत शेअर बाजारातून 1 लाख 23 हजार 25 कोटी रुपये काढून घेतले आहेत. तसेच, 15 मार्चअखेरीसच्या पंधरवड्यात विदेशी संस्थांची शेअर बाजारातील गुंतवणूक 79 अब्ज डॉलर्सने घटून 710 अब्ज डॉलर्सवर आली आहे. कोरोनानंतरची ही सर्वाधिक शेअर विक्री आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT