मुंबई : राज्यातील शिक्षकांचे वेतन उशिरा होणार असल्याच्या शुक्रवारी दिवसभर वावड्या उडाल्याने शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा चिंतेत पडले होते. मात्र, शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षकांचे पगार वेळेवर होणार असल्याचे सांगितले असून, शिक्षकांनी या वावड्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्हा परिषदांच्या शाळा, खासगी अनुदानित प्राथमिक शाळा, अनुदानित खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या जवळपास साडेचार लाखांपर्यंत आहे. या सर्व कर्मचार्यांना साधारण 1 ते 5 तारखेपर्यंत वेतन दिले जाते. सुट्टीचा दिवस असल्यास एक दिवस अगोदर वेतन संबंधित कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा होते. तथापि, शिक्षकांच्या पगारासाठी उपलब्ध असलेला निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे वळविल्यामुळे या महिन्यात शिक्षकांचे वेळेवर पगार होणार नाहीत, अशी वावडी उडविण्यात आली.