मुंबई : पायाभूत सुविधा, उद्योग सुलभता आणि प्रतिष्ठेचे वलय यांचा एकत्रित परिणाम मुंबईच्या गृह विक्री क्षेत्रातील अर्थकारणावर वर्षानुवर्षे होत आला आहे. आलिशान घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून, आता या किमतींनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. वरळी सी फेस येथे तब्बल 639 कोटींचा गृह विक्री व्यवहार झाला आहे.
वरळी येथे नमन ग्रुपचा ‘नमन झाना’ प्रकल्प सध्या सुरू आहे. या 40 मजली इमारतीमध्ये केवळ 16 घरे आहेत. त्यापैकी 22 हजार 500 चौरस फुटांची दोन ड्युप्लेक्स घरे 639 कोटींना खरेदी करण्यात आली आहेत. प्रतिचौरस फूट 2 लाख 80 हजार रुपये दराने या घरांची विक्री झाली आहे. पुढील वर्षी या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आहे.
आतापर्यंत वरळी आणि मलबार हील येथे झालेल्या आलिशान घरांच्या व्यवहाराच्या दुप्पट किमतीचा व्यवहार ‘नमन झाना’मध्ये झाला आहे. या ठिकाणी पूर्वी एका पारशी कुटुंबाचा बंगला होता. इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या घराच्या बाजूलाच हा भूखंड आहे. या भूखंडाच्या विक्रीतून मिळालेली रक्कम पारशी कुटुंबीय धर्मादाय संस्थेला दान करणार आहेत.
सागरी किनारा नियमन क्षेत्राचे निकष शिथिल केल्यानंतर जी नवी विकासकामे सध्या सुरू आहेत, त्यापैकी सर्वाधिक किमतीचे व्यवहार झालेल्या यादीत ‘नमन झाना’चे स्थान सर्वात वरचे आहे. काही वर्षांपूर्वी उदय कोटक यांनी हा भूखंड विक्रमी किमतीत खरेदी केला होता.