मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी 'ईडी'च्या अधिकार्यांनी सुमारे 11 तास चौकशी केली. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ते 'ईडी'च्या दक्षिण मुंबईतील बॅलोर्ड पीयर येथे असलेल्या कार्यालयात दाखल झाले. रात्री 10 च्या नंतरच ते 'ईडी' कार्यालयातून बाहेर पडले. महाराष्ट्र हा दिल्लीसमोर कधीच झुकत नाही, असे म्हणत या स्थितीत लढण्याचा निर्धार त्यांनी रात्री उशिरापर्यंत थांबलेल्या शेकडो पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केला.
कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यानंतर त्याचा महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता आणि रोहित यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीतर्फे हा लिलाव करण्यात आला होता. या लिलाव प्रक्रियेदरम्यान गैरव्यावहार झाल्याच्या आरोपावरून 'ईडी'ने रोहित पवारांना चौकशीसाठी बोलावले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. बॅलोर्ड पीयर परिसरात जागोजागी रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येत होती.
'पळणारा नाही, तर लढणारा दादा' असा उल्लेख या बॅनरवर करून नाव न घेता भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांनाही टोला लगावण्यात आला आहे. 'ईडी' कार्यालय परिसरात 'दडपशाहीच्या कारवाईचा निषेध' अशी घोषणाबाजी करत रोहित पवार यांच्या समर्थनार्थ शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी 'ईडी' कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली. या पार्श्वभूमीवर 'ईडी' कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यांनी सकाळी विधानभवनात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर शरद पवार यांची 'ईडी' कार्यालयाजवळच असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयात भेट घेतली. यावेळी पवार यांनी रोहित यांना यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक दिले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या.
त्यानंतर रोहित यांनी पवारांचे आशीर्वाद घेतले. ते 'ईडी' कार्यालयाकडे निघाले तेव्हा त्यांच्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर आणि सुनील भुसारा होते. शरद पवार हे रात्री 9 वाजेपर्यंत पक्ष कार्यालयात थांबून रोहित बाहेर येण्याची वाट बघत होते. त्यानंतर ते घरी निघून गेले.