मुंबई : ‘माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपला, असे विधान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यापाठोपाठ आता या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपसोबत असताना विलीनीकरणाचा विषयच येत नाही, असे बोलून विलीनीकरणावरून उडालेला राजकीय धुरळा खाली बसविण्याचा प्रयत्न केला आहे.
सुळे म्हणाल्या, विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे नसून, यासंदर्भात आपल्याशी कोणाचीही चर्चा झालेली नाही. शरद पवार यांना देशातील सर्वच पक्षांचे नेते भेटत असतात. अजित पवार यांचा गट वेगळा झाल्यानंतरही त्या गटातील अनेक नेते, आमदार आणि मंत्री शरद पवार यांची भेट घेतात. मात्र, अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती.
अजित पवार यांनी स्वतः याबाबत आमच्याशी संवाद साधला होता. १७ जानेवारी रोजीचा गोविंदबाग येथे झालेल्या चर्चेचा व्हिडीओही सर्वांसमोर आहे. त्यामुळे या घडामोडी कोणापासून लपलेल्या नव्हत्या, मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसांतच आपण या विषयावर पडदा टाकला आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
या गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, विलीनीकरणाची आमच्यामध्ये कसली चर्चा नाही आणि भाजपसोबत असताना विलीनीकरणाचा विषयही येत नाही. त्यामुळे आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार आहे,’ अशी टीका रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे केली.