Ritu Tawde Mumbai Mayor
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीचा गाडा हाकणाऱ्या मुंबई महापालिकेत अखेर भाजपाचे कमळ फुलले आहे. कोकणकन्या रितू तावडे महापौर पदी तर उपमहापौर पदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान झाले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचे भाजपाचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. त्यामुळे भाजपा नगरसेवकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असतानाच दुसरीकडे काँग्रेस- ठाकरे गटाच्या नगरसेवकांमुळे सभागृहात पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता.
मुंबई महापौर व उपमहापौर पदासाठी विरोधात असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे महापौर व उपमहापौर पदाची पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. पिठासीन अधिकारी असलेल्या महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आल्याचे जाहीर करत, महापौर पदी रितू तावडे उपमहापौर पदी संजय घाडी यांची रीतसर निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी खासदार राहुल शेवाळे व अन्य नेत्यांनी महापौर व उपमहापौर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
सभागृहात पीठासीन अधिकारी बोलत असताना विरोधी पक्षातून फक्त शिवसेनेने विरोध केला. किशोरी पेडणेकरांनी आक्षेप घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेस नगरसेवकांना बसायला जागा नाही
काँग्रेसच्या नगरसेवकांना सभागृहात बसायला जागा नव्हती आणि यामुळे काँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक झाले.
महापौरपदी निवड जाहीर झाल्यानंतर रितू तावडेंकडे सभेची सूत्रे देण्यात आली. महापौरांच्या पहिल्याच भाषणात विरोधकांनी घोषणाबाजी केली. 'आई भवानी चरणी नतमस्तक होते, मी शपथ घेते की आज पासून मुंबईची सेवक म्हणून काम करणार', असे सांगत त्यांनी भाषणाला सुरूवात केली. दुसरीकडे बसायला जागा नसल्याने काँग्रेसच्या नगरसेविका थेट जमिनीवरच बसल्या. 'मुख्यमंत्र्यांची बहीण खुर्चीवर, लाडकी बहीण जमिनीवर', अशा घोषणा त्यांनी दिल्या.
विरोधी पक्षातील महिला नगरसेविकांच्या भूमिकेवर महापौर रितू तावडे चांगल्याच संतापल्या. एकूण पाच वेळा महापौरांच्या भाषणात हस्तक्षेप केल्याने त्या संतापल्या. महापौरांनी भाषणादरम्यान काँग्रेसच्या नगरसेवकांना बसण्याची विनंतीही केली, मात्र त्यानंतरही आंदोलन सुरूच होते.
काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या भाषणाच्या कागदांवरच 'महिला महापौर, महिलांचाच अपमान' असे लिहून निषेध केला.
महापौरांच्या भाषणानंतर उपमहापौर संजय घाडी यांचे भाषण सुरु झाले. भाषण सुरु होताच ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या. काँग्रेसच्या लाडक्या बहिणींना विनंती आहे खाली बसून घ्या, असे घाडींनी सांगितले असता नगरसेवक आणखी आक्रमक झाले. उपमहापौरांच्या भाषणाचे कागद फाडत ठाकरेंचे सर्व नगरसेवक सभागृहाच्या बाहेर गेले. ठाकरेंचे नगरसेवक बाहेर जाताच उपम्हापौरांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना आता जागा झाली बसा, असं सांगत चिमटा काढला.