मुंबई : सध्या बैठ्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून तरुणांमध्ये संधिवाताचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. 20 ते 40 वयोगटातील रुग्णांमध्ये संधिवाताच्या प्रकरणांमध्ये तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर महिन्याला बाह्यरुग्ण विभागात येणार्या 10 पैकी 4 रुग्णांना सांधेदुखी, कडकपणा आणि सूज यांसारखी लक्षणे दिसून येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
संधिवात ही आता फक्त वृद्धांपुरती मर्यादित समस्या राहिलेली नाही. वेगाने बदलणारी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीची बसण्याची पद्धत आणि ताणतणाव या घटकांमुळे तरुणांमध्येही हा आजार सामान्य होत चालला आहे. बरेच जण सुरुवातीच्या लक्षणामध्ये सांध्यांमधील कडकपणा, हलकी वेदना किंवा सूज याकडे दुर्लक्ष करतात, मात्र त्याचे रूपांतर पुढे दीर्घकालीन वेदना आणि अपंगत्वात होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अमित ग्रोव्हर यांनी सांगितले की, 20 ते 40 वयोगटातील रुग्णांमध्ये संधिवाताच्या प्रकरणांमध्ये 40 टक्के वाढ दिसून येते. जास्त वेळ बसून राहणे, व्यायाम टाळणे, लठ्ठपणा आणि ताण हे घटक याला कारणीभूत ठरतात. सांधे कडक होणे, वेदना, सूज आणि थकवा, अशी लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे व तणाव कमी ठेवणे या जीवनशैलीतील बदलांनी या आजाराची प्रगती रोखता येते.
ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीसनत राव म्हणाले, “तरुण वर्ग बहुतेक वेळा सांध्यातील कडकपणा किंवा वेदनेकडे दुर्लक्ष करतो. परंतु ही संधिवाताची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. 20 ते 40 वयोगटातील रुग्णांमध्ये संधिवाताची प्रकरणे 20 टक्क्यांनी वाढली आहेत. वेळीच निदान झाल्यास सांध्यांवरील सूज आणि वेदना नियंत्रित ठेवता येतात तसेच दीर्घकालीन नुकसान टाळता येते.” संधिवाताचे दोन प्रमुख प्रकार असून ऑस्टियोआर्थरायटिस (सांध्यांची झीज) आणि रूमेटॉईड आर्थरायटिस (स्वयंप्रतिकार आजार) हे दोन्ही तरुण वयोगटातही दिसत आहेत. नियमित शारीरिक हालचाल, संतुलित आहार आणि ताणतणाव नियंत्रण या गोष्टींनी या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.