भोगवटा प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी  Pudhari File Photo
मुंबई

भोगवटा प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

डोंबिवलीतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर महारेराचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसांना प्रतिसाद म्हणून 3 हजार 699 प्रकल्पांनी संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून त्यांना मिळालेले भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड केले आहे. कल्याण - डोंबिवली भागातील गृहनिर्माण प्रकल्पातील फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व भोगवटा प्रमाणपत्रे महारेराने संबंधित प्राधिकरणांकडून प्रमाणित करून घेण्याचे ठरविले आहे.

सर्व संबंधित प्राधिकरणांना या प्रकल्पांचा तपशील पाठवून या प्रकल्पांना खरेच भोगवटा प्रमाणपत्र जारी केले आहे का याची खात्री करून त्याबाबतची वस्तुस्थिती महारेराचे पत्र मिळाल्यापासून 10 दिवसांत कळवण्याची विनंती करण्यात येणार आहे. विहित कालावधीत प्राधिकरणांकडून ज्या प्रकल्पांबाबत प्रतिसाद मिळणार नाही त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र खरे असल्याचे गृहीत धरून त्या अनुषंगाने प्रकल्प पूर्ण झाल्याची प्रक्रिया महारेरा सुरू करेल. यात काही चुकीचे झाल्यास त्याची जोखीम आणि खर्चासह संपूर्ण जबाबदारी महारेराने संबंधित प्राधिकरणावर टाकली आहे.

यात मुंबई महाप्रदेशातील 1 हजार 819, पुणे परिसरातील 1 हजार 223, नाशिक परिसरातील 273, छत्रपती संभाजीनगर परिसरातील 132, अमरावती परिसरातील 84 आणि नागपूर परिसरातील 168 अशा एकूण 3 हजार 699 प्रकल्पांचा समावेश आहे प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाला काही अटींसापेक्ष सदनिका विक्रीसाठी महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रकल्प उभारणीच्या काळात त्रैमासिक प्रगती अहवाल, वार्षिक अंकेक्षण अहवाल सादर करावे लागतात.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्राधिकरणाचे भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. हे भोगवटा प्रमाणपत्र महारेराने स्वीकारले की संबंधित प्रवर्तकाला त्याच्या खात्यातील सर्व पैसे काढण्याची मुभा असते. शिवाय त्यांना त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने कुठलीही विवरणपत्रे भरावी लागत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT