परतीचा पाऊस बिघडवणार मुंबईकरांचे आरोग्य !  file photo
मुंबई

Mumbai Rain | परतीचा पाऊस बिघडवणार मुंबईकरांचे आरोग्य !

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : परतीच्या पावसाने मुंबईकरांची (Mumbai Rain) अक्षरशः दाणादाण उडवलेली असतानाच आता तुंबलेल्या पाण्यामुळे लेप्टो, मलेरिया, डेंग्यूच्या आजारांना निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

परतीच्या पावसाने दोन दिवसांपूर्वी मुंबईत (Mumbai Rain) धुमशान घातले. यावेळी ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाला असला तरी, या पाण्यामुळे आजारांना निमंत्रण मिळणार आहे. तुंबलेल्या पाण्यातून लाखो मुंबईकरांनी कशीबशी वाट काढत घर गाठले. पण हे तुंबलेले पाणी किती घातक आहे, याची कल्पना मुंबईकरांना नाही. तुंबलेले पाणी केवळ पावसाळी नसून गटार तुंबल्यामुळे हे पाणीही रस्त्यावर आले होते. या पाण्यात उंदीर, घूस व अन्य जनावरांचे मलमूत्र मिसळलेले असल्यामुळे या पाण्यातून गेल्यामुळे लेप्टोची लागण होण्याची भीती असते. विशेष म्हणजे ज्याच्या पायाला जखम असेल अशांना लेप्टोचा धोका अधिक असतो. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत लेप्टोचे रुग्ण वाढण्याची भीती कीटकनाशक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. केवळ लेप्टोच नव्हे, तर तुंबलेले पाणी जेथे साठून राहिले आहे. तेथे मलेरिया, डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

डेंग्यू-मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या पाण्यातच होते. अगदी साचलेल्या चमचाभर पाण्यातही डासांची उत्पत्तीस्थळे आढळून येतात. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे तुंबलेले पाणी करवंटी, टायर, झोपड्यांच्या पत्र्यावर टाकण्यात आलेल्या ताडपत्री व अन्य वस्तूंमध्ये साठून राहिल्यास मलेरिया डेंग्यू पसरवणारे डास अंडी घालून त्यांची उत्पत्ती वाढू शकते. साचलेल्या पाण्यात डासाच्या मादीने अंडी घातल्यास त्यातून डास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवडाभराचा कालावधी लागतो. त्यामुळे साचलेले पाणी तातडीने नष्ट करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अशी वाढते डासांची उत्पत्ती

डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास १०० ते १५० अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान हे ३ आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान ४ वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे ४०० ते ६०० डास तयार होतात. हे डास मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.

बायो ट्रॅपचा वापर

मलेरिया नियंत्रणाकरिता इको बायो ट्रॅपचा (स्टार्ट अप) चा समावेश केलेला आहे. या अभिनव ट्रॅपमुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरविणाऱ्या डासांची संख्या नियंत्रित होण्यास मोठी मदत होत आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या सापळ्याकडे त्यातील 'अॅट्रॅक्टन्ट्स' मुळे डासाची मादी आकृष्ट होते आणि त्यातील पाण्यात अंडी घालते. ही अंडी पाण्यातील वैशिष्ट्यपूर्ण कीटकनाशकांमुळे तात्काळ नष्ट होतात.

नागरिकांनी ही काळजी घ्यावी

कोणताही ताप डेंग्यु, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या, पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा, उंदीर- घुशींचा नायनाट करावा, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग वापरात आणावे, आजूबाजूच्या परिसरात कचरा साचणार नाही याची काळजी घ्यावी, ट्रेकींग, अॅडव्हेंचर स्पोर्टस् खेळाचे प्रकार टाळावेत.

लेप्टोची लक्षणे

या रोगाचे ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी लागणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव आदी लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास मूत्रपिंड व यकृत निकामी होऊन मृत्यू होण्याचा धोका संभवतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT