मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माजी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी काढलेल्या आदेशाच्या धास्तीने हकालपट्टी टाळण्यासाठी एसटीतील दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी महाव्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला होता. त्याच दोन अधिकाऱ्यांना आता पुन्हा कंत्राटी पद्धतीने महामंडळात कामावर घेण्याचे आदेश एसटीचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी काढले आहेत.
एसटीला तोट्यात टाकण्याचे काम माधव काळे आणि अनंत खैरमोडे या जबाबदार अधिकाऱ्याकडून करण्यात आले. त्याच बरोबर एसटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी धोरणात्मक उपाय राबविण्यात हे अधिकारी सातत्याने कमी पडले. माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शिफारशीने या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांनी राजीनामा देताना वैयक्तिक कारण दिले होते. माधव काळे यांच्याकडे महामंडळाच्या कर्मचारी वर्ग आणि नियोजन पणन या अतिशय महत्त्वाच्या विभागाची तर अनंत खैरमोडे यांच्याकडे यंत्र विभागाची महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोणतीही दखलपात्र कामगिरी केली नाही. तरीदेखील मंत्र्याच्या मर्जीनुसार त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपक्रम, समित्या, महामंडळातील अशासकीय नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार राज्याचे माजी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सात दिवसात या संबंधीचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. त्या आदेशामुळे महामंडळातील कंत्राटी महाव्यवस्थापकांचे धाबे दणाणले होते. हकालपट्टी टाळण्यासाठी त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. आता पुन्हा या अधिकाऱ्यांना घाईगडबडीत नियुक्ती देण्यामागे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांचे प्रयोजन काय? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत भरत गोगावले यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो होऊ शकला नाही.
भरत गोगावले हैं नुकतेच एसटीचे अध्यक्ष झाले आहेत. माधव काळे हैं महामंडळातील खूप भ्रष्ट अधिकारी आहेत. खूप साऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. भरत गोगावले यांना कदाचित हे माहीत नसावे. या विषयी त्यांच्याशी बोलून त्यांना हे निदर्शनास आणून देऊ.
- गोपीचंद पडळकर, आ. भाजपा