म्हाडाच्या बृहत्सूचीवरील घरांसाठी रहिवाशांचा संघर्ष सुरू आहे. File Photo
मुंबई

म्हाडाच्या बृहत्सूचीवरील घरांसाठी रहिवाशांचा संघर्ष

Mhada News : वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरांत राहणाऱ्यांना हक्काचे घर मिळेना; हजारो कुटुंबांची होरपळ

पुढारी वृत्तसेवा
नमिता धुरी

मुंबई : इमारत धोकादायक झाली की हक्काची घरे रिकामी करा, म्हाडा सांगेल त्या संक्रमण शिबिरात जा, म्हाडा म्हणेल तेव्हा या संक्रमण शिबिरातून त्या संक्रमण शिबिरात स्थलांतर करत राहा, अशी स्थिती म्हाडाकडून तात्पुरता आसरा घेतलेल्या हजारो कुटुंबांची आहे. या कुटुंबांसाठी बृहतसूची ही एकमेव आशा असली तरी मूळ जागी पुनर्विकास होण्याची आशा दाखवत म्हाडाचे अधिकारी या लोकांना बृहतसूचीवरील घरेही मिळू देत नाहीत.

माझगाव म्हातारपाखाडी येथील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीत तुकाराम नाडकर अनेक वर्षे वास्तव्यास होते. ती इमारत धोकादायक झाल्यानंतर १९८५ साली त्यांना चेंबूर येथील सुभाषनगर संक्रमण शिबिरात जागा देण्यात आली. गेली जवळपास ४० वर्षे ते आपल्या कुटुंबासह संक्रमण शिबिरात राहात आहेत. संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाने बृहतसूची (मास्टरलिस्ट) सुरू केली. यात अर्ज करून सोडतीद्वारे घर मिळवण्याची संधी नाडकर यांच्याकडे होती. २०१४ साली ते या प्रक्रियेसाठी पात्र ठरले होते.

म्हातारपाखाडी येथील इमारतीचा पुनर्विकास होणार असल्याचे सांगून २०१६ साली नाडकर यांना बृहतसूचीसाठी अपात्र ठरवण्यात आले. पुनर्विकास करण्यासाठी काही वर्षांपूर्वी विकासकाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे; मात्र त्याने तेथे काम सुरू केलेले नाही. शिवाय पुनर्विकासाच्या नियमानुसार द्यावे लागणारे आगाऊ भाडेही विकासकाने दिलेले नाही. म्हाडा विकासकावर कारवाई करत नाही आणि बृहतसूचीमधून घरही देत नाही. त्यामुळे आज वयाची ८० वर्षे ओलांडल्यानंतरही नाडकर एकप्रकारे बेघरच आहेत.

सचिन घाणेकर यांच्या वडिलांचेही घर म्हातारपाखाडीतील इमारतीत होते. १९८५ ते २०१७ या काळात घाणेकर कुटुंबीय सुभाषनगर संक्रमण शिबिरात राहात होते. या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे सांगून त्यांना २०१८ साली मुलुंडच्या गवाणपाडा संक्रमण शिबिरात पाठवण्यात आले. त्यांना आजही म्हातारपाखाडी येथील घराची प्रतीक्षा आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त नृत्य दिग्दर्शक नरेंद्र पंडित यांना १९८२ साली कुंभारवाडा येथील घर म्हाडाच्या नोटिशीमुळे सोडावे लागले. त्यांना घाटकोपर येथील संक्रमण शिबिरात पाठवले जाणार होते; मात्र तेथील इमारतीची अवस्था चांगली नसल्याने त्यांनी गोरेगाव येथे घर देण्याची विनंती केली. बराच पाठपुरावा केल्यानंतर त्यांना ओशिवरा संक्रमण शिबिरात पाठवण्यात आले.

अपुरा पाणी पुरवठा, चोरीमारी असा सगळा मनःस्ताप भोगत काही वर्षे घालवली खरी पण १९९२ सालच्या दंगलीनंतर तिथे थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी गोरेगावच्या सिद्धार्थनगर संक्रमण शिबिरात बदली करून घेतली. दारुची दुकाने, जुगाराचे अड्डे, दलालांची मनमानी या सगळ्याला कंटाळत त्यांनी एकेक दिवस पुढे ढकलला. २०१३ साली म्हाडाने त्यांची रवानगी बोरिवलीला गोराई रोड येथील संक्रमण शिबिरात केली. येथेही त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पंडित यांनी बृहतसूचीसाठी अर्ज केला होता. सर्व कागदपत्रे म्हाडामध्ये जमा केली होती; मात्र म्हाडाच्या अंतर्गत भोंगळ कारभारामुळे ती कागदपत्रे संबंधित विभागाकडे जमाच झाली नाहीत व त्यांची बृहतसूचीवरील घराची संधी हुकली.

  • नाडकर कुटुंबियांसह ७ कुटुंबांना आता साकीनाका संक्रमण शिबिरात स्थलांतरित होण्यास म्हाडाने सांगितले आहे; मात्र ही इमारत कोविड सेंटर म्हणून वापरली गेली होती. येथील उद्वाहन बंद आहे. म्हाडाने दिलेले तुकाराम नाडकर घर पाचव्या मजल्यावर आहे. कोणीही राहात नसल्याने इमारत ओसाड आहे. त्यामुळे नवी मुंबईला भाड्याने राहात आहेत, अशी माहिती तुकाराम नाडकर यांचा मुलगा प्रवीण नाडकर यांनी दिली.

बृहतसूचीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. जी बेकायदेशीर नावे बृहतसूचीमध्ये सापडली त्यावर म्हाडाचे अधिकारी काहीच कारवाई करत नाहीत. उलट त्यांना पात्र ठरवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मूळ इमारतींचा पुनर्विकास कधी होणार हे माहीत नाही. त्यामुळे मूळ भाडेकरूंना पात्र करून घरे दिली गेली पाहिजे.
अभिजीत पेठे, अध्यक्ष, ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT